मराठा बहुजनांनी संघटनात्मक प्रगतीस प्राधान्य द्यावे : शिवश्री चंद्रशेखर शिखरे!* संस्थांच्या प्रगत वाटचालीसाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची : भाईजी

मराठा बहुजनांनी संघटनात्मक प्रगतीस प्राधान्य द्यावे :  शिवश्री चंद्रशेखर शिखरे!
* संस्थांच्या प्रगत वाटचालीसाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची : भाईजी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         शिवनीतीचा अभ्यास केल्यास महाराजांची अर्थ नीती उत्तम दर्जाची होती असे दिसते. आर्थिक नियोजन त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळले व सामान्य घटकांच्या विकासासाठी वापरले. आज मराठा बहुजन समाजाने वैयक्तिकरित्या आर्थिक प्रगती साधली असली तरी संघटनात्मक आर्थिक प्रगती कडे दुर्लक्ष झाले. वैयक्तिक बरोबर संघटनात्मक आर्थिक प्रगती करण्याची गरज आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी व सामान्य घटकांचा विकास साधण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार इंजि. शिवश्री चंद्रशेखर शिखरे यांनी केले. तर संस्थांच्या प्रगत वाटचालीसाठी संचालकांची अर्थसाक्षरता महत्त्वाची असल्याचे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक म्हणाले. मराठा सेवा संघाच्या नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

         रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी शरद कला महाविद्यालय बुलढाणा या ठिकाणी मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मराठा सेवा संघाचे राज्य महासचिव इतिहासकार शिवश्री चंद्रशेखर शिखरे होते. तर राधेश्याम चांडक, आमदार धीरज लिंगाडे, डीडीआर महेंद्र चव्हाण ,जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी अशोकराव खरात आदींची उपस्थिती लाभली.

        जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती पुष्पाताई गायकवाड यांच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.मनोहर तुपकर व संचालक मंडळाने मान्यवरांचा ' बुक देऊन ' पुस्तके देऊन सत्कार केला. 
       पुढे बोलताना चंद्रशेखर शिखरे यांनी शिवरायांच्या अर्थ नीतीवर प्रकाश टाकला. महाराजांनी अर्थकारण केले परंतु हे अर्थकारण समाज हिताशी निगडीत होते. सहकारी संस्थांनी शेतकरी व विद्यार्थी वर्गासाठी काही केल्यास ते समाज हिताचे ठरू शकते असे ते म्हणाले. बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी संस्थेच्या संचालकांनी आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभासदांनी काही नियम घालून त्याचा अवलंब केल्यास संस्था प्रगतीचे शिखर गाठू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण बुलढाणा अर्बन असल्याचे सांगितले. विद्यार्थी शिक्षणासाठी संस्थांमध्ये प्राधान्य दिले तर समाज उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष हातभार लावल्यासारखे होणार असल्याचे भाईजी म्हणाले. आमदार धीरज लिंगाडे यांनी बुलढाणा अर्बन हिच पतसंस्थांचा आधार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी डॉक्टर अशोकराव खरात यांनी सहकाराच्या माध्यमातून अर्थक्रांती घडून आणणे शक्य असल्याचे सांगितले. तर डीडीआर महेंद्र चव्हाण यांनी शिस्त व पारदर्शीपणा आवश्यक असल्याचे सांगून सहकाराला प्रगतीपथावर नेण्यासाठी विधायक विचाराची गरज प्रतिपादन केली. प्रास्ताविक डॉक्टर मनोहर तुपकर यांनी केले. संस्थेच्या उभारणीची भूमिका शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलेल्या पंचसूत्रीनुसार असल्याचे त्यांनी सांगितले.          शिक्षणाधिकारी आकाळ, प्राचार्य विष्णुपंत पाटील आदींनी विचार व्यक्त केले.यावेळी शिवश्री पांडुरंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी इंजिनियर रविकांत काळवाघे, एडवोकेट प्रकाश जाधव ,इंजिनिअर गुलाबराव कडाळे ,सौ. सिंधुताई पाटील , इंजिनीयर दत्तात्रय शेळके , डॉक्टर सौ.ज्योती खेडेकर ,विजय काकडे, सौ वैशाली आकाळ,मोहिनी चेके, डॉक्टर अंकिता खरात, इंजिनिअर कोमल तायडे, नंदकिशोर सरडे ,रामेश्वर भालके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन शिवश्री संजय खांडवे यांनी तर आभार प्रदर्शन कोमल तायडे यांनी मानले. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकरांनी प्रेक्षकांमध्ये बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

 * ही तर राज्यातील एकमेव संस्था :  केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
          मराठा सेवा संघाच्या संस्थेतील सर्व संचालक हे उच्च पदस्थ राहिले आहे. अशा प्रकारचे संचालक मंडळ असणारी ही बुलढाण्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव संस्था असावी, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. सायंकाळी त्यांनी संस्थेच्या कार्यालयात भेट दिली. पतसंस्था दररोज निघत आहे, तशा त्या डबघाईस जात आहे. यासाठी बडेजाव कमी करण्याची व विश्वासाला तडा जाणार नाही, असे कार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.