बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील विद्यार्थ्यांची 7 जुलै 2025 रोजी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या प्रेरणेने विधान भवन मुंबई येथे शैक्षणिक भेटीचे नियोजन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, सौ. कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.
विधानभवन भेट यामध्ये मुख्याध्यापक सतीश रोढे, रिटा काटकर , प्रशांत काकडे व विद्यार्थ्यांचा 21 जणांचा चमू शाळेच्या विशेष शैक्षणिक सहलीद्वारे मुंबई येथे पोहोचला. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना मुंबईची ऐतिहासिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी याबाबत माहिती देण्यात आली. मुंबईतील विधीमंडळ भवनात पोहोचताच विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. सुरक्षा तपासणी व ओळखपत्र तपासणीनंतर विद्यार्थी सभागृहात दाखल झाले. त्यांना सभागृहाचे विधानसभा, विधानपरिषद कक्ष, प्रेस गॅलरी, मंत्रीगृह, पाहुणा गॅलरी आदींचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी विधीमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांनी विशेष माहिती सत्र घेतले. त्यांनी अधिवेशनातील चर्चेचे स्वरूप, आमदार कार्य, प्रश्नोत्तर तास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सुदैवाने भेटीच्या दिवशी अधिवेशन चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही आमदार व मंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
मुंबईतील विधीमंडळ भवनात भेट देताना विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या विधानसभा गॅलरीतून प्रत्यक्ष चालू अधिवेशनाचे सत्र पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विद्यार्थ्यांना लोकशाहीचे जिवंत रूप समजले. सत्ता आणि विरोधक यांच्यातील वाद-संवाद विद्यार्थ्यांनी पाहिलं की, सत्ताधारी पक्षाने सादर केलेल्या एका नवीन विधेयकावर विरोधकांनी तात्काळ आक्षेप घेतला. सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांच्या धोरणाचे समर्थन करत होते, तर विरोधकांनी त्यातील त्रुटींवर बोट ठेवत, खुल्या चर्चेची मागणी केली. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी पाहिलं की, विरोधक सत्ताधारी पक्षावर प्रश्न विचारून लोकहितासाठी चर्चा उभी करतात, तर सत्ताधारी विकास योजनांचे समर्थन करतात. यावेळी विद्यार्थ्यांनी पाहिलं की प्रश्नोत्तर तासात विविध प्रश्न वेळेवर मांडले जात होते. सभागृहातील शिस्त, बोलण्याची परवानगी, अध्यक्षीय निर्देश या सगळ्यांचं काटेकोर पालन होत होतं. उपसभापतींनी दोन्ही बाजू शांततेने ऐकून घेतल्या आणि चर्चेला योग्य मार्गदर्शन केलं.
* आमदार संजय गायकवाड यांची भेट
या भेटी दरम्यान बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले "तुम्हीच उद्याचे पुढारी आहात. विचारशक्ती, जबाबदारी व लोकशाही मूल्यांची जाणीव हिच खरी शक्ती आहे."
* आ.सौ.श्वेताताई महाले यांची भेट
चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले "आजची पिढी ही उद्याची जबाबदार नागरिक बनणार आहे. त्यांनी विधिमंडळात जाऊन कार्यपद्धती, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मते, चर्चेची शैली, आणि निर्णय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे त्यांच्यात लोकशाही मूल्यांची अधिक ठाम रुजवणूक होईल. अशा शैक्षणिक उपक्रमांचे मी मनःपूर्वक कौतुक करते आणि भविष्यातही अशा भेटी अधिक प्रमाणात आयोजित कराव्यात, अशी माझी अपेक्षा आहे.
" विधिमंडळात भेट दिलेले हे विद्यार्थी उद्या विधीमंडळात आमदार, मंत्री किंवा प्रशासनातील अधिकारी म्हणून दिसतील, याची मला खात्री आहे. शाळेने विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्त्वाची जाणीव जागवली याचे कौतुक वाटते." अशी प्रतिक्रिया सौ. कोमलताई झंवर यांनी दिली.