मेहकरची यंत्रणा अजगरा सारखी सुस्त : शेतकऱ्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी ! * आमदार सिध्दार्थ खरात यांचा वीज वितरणच्या बैठकीत इशारा! * दांडी बहाद्दर ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, सौर ऊर्जेच्या तक्रारीबाबत विधानसभेत आवाज उठवणार - आ.खरात

मेहकरची यंत्रणा अजगरा सारखी सुस्त :  शेतकऱ्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी ! 
* आमदार सिध्दार्थ खरात यांचा वीज वितरणच्या बैठकीत इशारा!
 * दांडी बहाद्दर ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, सौर ऊर्जेच्या तक्रारीबाबत विधानसभेत आवाज उठवणार - आ.खरात 
मेहकर :  (एशिया मंच न्युज)
      विज वितरण कंपनी ग्राहकांना २४ तास सेवा देत‌ असते, असे असताना काही कर्मचारी मात्र कामात कुचराई करतात तर काही कर्मचारी शेतकऱ्यांना मुद्दामहून त्रास देतात. विशेषत: मेहकर मधील बहुतांश यंत्रणा अजगरा सारख्या सुस्त असल्याचे दिसून आले आहे. यापुढे शेतकऱ्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दमच आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला. मिटींगला दांडी मारलेल्या व कामात हलगर्जी करणाऱ्या  ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देत, सौर ऊर्जे बाबतच्या तक्रारींबाबत विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
      मेहकर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीजेबाबत असलेल्या तक्रारी जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी मेहकर येथील के.व्ही प्राईड हॉटेल येथे मेहकर व लोणार तालुक्यातील वीज वितरणच्या बैठकीचे आयोजन  २३ जून रोजी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष पदावरून आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. सदर बैठकीमध्ये तक्रारींचा ढीग लागला होता. विशेषता मेहकर भाग दोन ,डोणगाव भाग दोन , लोणी गवळी, सुलतानपूर आदी सेक्शन मधील तक्रारी सर्वात जास्त होत्या तर जानेफळ सेक्शनची केवळ एक तक्रार असल्याचे यावेळी दिसून आले.

         पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, मेहकर मतदार संघात वीज वितरण अंतर्गत ३० एजन्सीज काम करत असताना केवळ तीन एजन्सीचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत. ही फार खेदाची बाब आहे, याबाबत लवकरच ठेकेदारांची बैठक लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांना दिले. मेहकर भाग दोन,डोणगाव भाग दोन सह मेहकर व लोणार तालुक्यातील विविध संवर्गातील ४२ रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही आ.खरात यांनी‌ यावेळी सांगितले. सदर बैठकीत वीज वितरण बाबतच्या तक्रारींचा पाऊस पडला होता . विशेषतः मेहकर ग्रामीण भाग २, लोणी गवळी, डोणगाव भाग दोन, सुलतानपूर आदी सेक्शनच्या तक्रारी जास्त दिसून आल्या तर जानेफळ सेक्शन च्या सर्वात कमी म्हणजे केवळ एकच तक्रार असल्याचे दिसून आले. 

       यावेळी मेहकरचे उप कार्यकारी अभियंता विरेंद्र कळसकर व लोणारचे उप कार्यकारी अभियंता उमेश शेंडे यांनी आलेल्या तक्रारींवर उत्तरे देऊन तक्रार कर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. अनेक कास्तकारांचा वीज वितरण कंपनीच्या काही   कर्मचाऱ्या बाबत रोष उफाळून आल्याचे यावेळी दिसून आले. कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांनी मेहकर तालुक्यात सर्वात जास्त थकबाकी असून, सदर थकबाकी भरण्याचे आवाहन यावेळी केले. 
        शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे, काँग्रेसचे अनंतराव वानखेडे, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, भास्करराव काळे आदींनी यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी निंबाजी पांडव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, ॲड संदीप गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ता घनवट, माजी नगर अध्यक्ष अशोक अडेलकर महाराज, पंकज हजारी, युवा सेना तालुका अध्यक्ष ॲड आकाश घोडे, ओमराजे गजभिये ,रमेश देशमुख, राजू भाऊ बुधवत, सुलतान शहर अध्यक्ष शिवप्रसाद जोगदंड महिला आघाडी तालुका प्रमुख तारामती जायभाये, उपजिल्हा प्रमुख आरती देशमुख, शहर अध्यक्ष नगमा गवळी, सुधाकर धाबे , संतोष नरवाडे, डॉ.भरत अल्हाट, संजय सुळकर, जानेफळचे शाखा अभियंता बेंडेवार सह विविध गावचे सरपंच, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच वीजवितरणचे कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात मेहकरचे उप कार्यकारी अभियंता विरेंद्र कळसकर व लोणार चे उप कार्यकारी अभियंता उमेश शेंडे यांनी वीज वितरणच्या सद्यस्थितीतील कामकाजाबाबत माहीती दिली . संचालन शैलेश बावस्कर यांनी केले. बरेच दिवसानंतर वीज वितरण बाबतच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्याने अनेकांनी‌ यावेळी समाधान देखील व्यक्त केले.