* 250 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त :
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
3 महिन्याच्या रेशन धान्याच्या नावावर बुलढाडाणा जिल्ह्यात काही रेशन माफिया सक्रिय झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत काम करणारे काही रेशन तस्कर गरीब जनतेच्या या धान्यावर डल्ला मारत असून काल बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका गोदामात मोठ्या प्रमाणात रेशनचा धान्य साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नांदुरा पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत एका गोदामावर धाड टाकली असता गुप्त माहिती खरी निघाली. त्या ठिकाणी जवळपास 250 क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ मिळून आले. या गोदामाला प्रशासनाने सील केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तीन महिन्याचा रेशन धान्य एकाच वेळी देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी 3 महिन्याचा धान्य एकाच वेळी उतरवण्याची व्यवस्था प्रशासनाकडे नाही. त्यासाठी मोठी साठवणूक क्षमता असलेले गोदाम जिल्ह्यात उपलब्ध नाही, हे विशेष. ज्या महिन्याचा धान्य रेशन दुकानदारांना उपलब्ध होत आहे तो धान्य दुकानावर अगोदर पोहोचलेल्या कार्डधारकांना 3 महिन्याचा धान्य वाटप केला जात आहे, दुकानात हा धान्य संपल्यानंतर पुन्हा त्या दुकानाच्या क्षमते प्रमाणे धान्य पुरविला जातो. या प्रमाणे चक्राकार पद्धतीने 3 महिन्याचे धान्य पुरविण्याचे नियोजन आहे. मात्र रेशन दुकान सोडून इतर ठिकाणी विनापरवानगी भाड्याने गोदाम घेऊन माल ठेवण्याची तरतूद नाही. मागे काही दिवसा अगोदर देखील एका ठिकाणी रेशनचा धान्य साठवून ठेवलेला होते, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील अपेक्षित कारवाई झाली नसल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होती. आता नांदुऱ्यात हे दुसऱ्यांदा रेशनचा साठा पकडण्यात आला आहे आणि या "सिल्वर" वाहतूक कंत्राटदाराशी संबंधित असलेल्या रेशन तस्करावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते? याकडे निश्चितच सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
* नियमानुसार कारवाईचे आदेश दिले :
नांदुरा येथील एका गोडाऊन वर पोलिस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत जवळपास 250 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. सदर धान्य तेथील रेशन दुकानदार ओम राठी यांचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदुरा तहसिलदार तसेच निरीक्षण अधिकारी यांना चौकशी करून योग्य कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे.
* सिल्वर रोडलाईन्सची भूमिका संशयास्पद :
बुलढाणा जिल्ह्यातील घाटा खालच्या भागात मोठ्या प्रमाणात रेशन धान्याचा काळा बाजार सुरू आहे. नांदुरा येथे ओम राठी या रेशन दुकानदाराच्या एका गोडाऊनवर प्रशासनाने काल धाड टाकली. त्यात जवळपास 250 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात रेशन धान्य वाहतुकीचा कंत्राट सिल्वर रोडलाईन्स यांच्याकडे आहे. नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी हे स्वतः सिल्वर रोडलाईन्स या वाहतूक कंत्राटदाराकडे नांदुरा तालुक्यात द्वारपोच योजनेचा काम करतात. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासाठी कार्यरत सिल्वर रोडलाईन्स या वाहतूक कंत्राटदाराची चौकशी सुद्धा अपेक्षित आहे.