* भारतीय सैन्य दलाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव केले अभिनंदन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
पहलगाम येथिल पर्यटकांवर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याचा बदला आज सकाळी भारतीय सैन्यांनी "ऑपरेशन सिंदुर" राबवत पाकीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन दहशतवाद्याचे कंबरडे मोडण्याच काम केले या "ऑपरेशन सिंदुर" मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैन्यांच अभिनंदन करत देशवासीयांची एकजूट राजकीय इच्छाशक्तती, आणि सैन्याने केलेली गगनभेदी कारवाईतुनच "ऑपरेशन सिंदुर" यशस्वी झाल्याची प्रतिक्रीया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मिरातील पहेलगाम येथिल भारतीय पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यानी त्यांचा धर्म विचारुन त्यांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झालेले असतांना त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब स्वत: जम्मू काश्मिरला आले. आपण सुध्दा पर्यटकांच्या मदतीला धावुन गेलो, त्यावेळी प्रत्येक भारतीयांची भावना या हल्ल्याचा बदला घेण्याची होती. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील दहशतवाद्याना चोख प्रत्युत्तर देवुन दहशतवाद्याचे कंबरडे मोडण्याचे सुतोवाच केले होते, त्यानुसार सैन्यांनी केलेल्या नियोजनांनंतर 7 मे च्या पहाटे पाकीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले.
"ऑपरेशन सिंदुर" मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन करत भारतीय सैन्यांच्या क्षमतेवर देशवासीयांना पुर्ण विश्वास आहे. संपुर्ण देशवासीयांची एकजूट त्यांच्या पाठीमागे उभी आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्यदलाच्या गगनभेदी कारवाईतुनच "ऑपरेशन सिंदुर" यशस्वी झाले आहे. भारतीय वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना नेतृत्वाचा सहभाग मोठा असुन ही कारवाई देशाच्या सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्याचे कंबरडे मोडणारी आहे. अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्ती ही महत्वपुर्ण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने "ऑपरेशन" सिंदुरच्या माध्यमातुन हे दाखवुन दिले आहे. दहशतवाद बिमोड करण्यासाठी अशा कारवाया सुरुच राहतील, असा विश्वासही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.