* मनोरुग्ण, दिव्यांग बांधवांसाठी करणार राशन दान
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशीला दीप लावू झोपताना, कोणती न जात त्यांची कोणता न धर्म त्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना या युक्तीप्रमाणे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनाथ, बेसहारा, मनोरुग्ण व दिव्यांग बांधवांसाठी किराणा साहित्य देण्याचा 'दिव्य' उपक्रम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने १२ मे रोजी राबविण्यात येणार आहे. बुलढाणा-खामगाव मार्गावरील दिव्य सेवा प्रकल्प बोथा फॉरेस्ट ज्ञानगंगा अभयारण्य गेट क्रमांक दोन वरवंड येथील 'दिव्या फाउंडेशनच्या' आश्रमात हा उपक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे. बुलढाणा शहराला अनेक वर्षांपासून सार्वजनिक जयंती उत्सवाची परंपरा लाभली आहे. यामुळे बुलढाण्यात विविध महापुरुषांच्या जयंती एकत्रित साजरा होत असल्याने वेळोवेळी सामाजिक एकात्मिकतेचे दर्शन घडून येते. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा यंदा दिमाखात पार पडला. दर वर्षाप्रमाणे विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये, सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. दरम्यान, येत्या सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनाथ, बेसहारा, मनोरुग्ण व दिव्यांग असलेल्या बांधवांसाठी राशन दान करण्यात येणार आहे. दिव्य सेवा प्रकल्प दिव्या फाउंडेशनच्या आश्रमात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत हजर असतील. याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत यांनी केले आहे.