शहरात विविध ठिकाणी महात्मा फुलेंसह महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन * शोभायात्रेतील वेशभुषांनी वेधले लक्ष

शहरात विविध ठिकाणी महात्मा फुलेंसह महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन 
* शोभायात्रेतील वेशभुषांनी वेधले लक्ष 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी बुलडाण्यात उत्सव समितीच्यावतीने मोटरसायकल रॅली, शोभायात्रा, जनजागरणपर कार्यक्रम आदी घेण्यात आले. यावेळी शहरातून उत्सव समितीच्यावतीने मोटार सायकल रॅली काढुन विविध ठिकाणच्या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

 शहरात महात्मा फुले यांची जयंती, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी मोठया धूमधडाक्यात साजरी केली जाते. दरम्यान यावेळी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महात्मा फुले विद्यालयात फुले दांपत्याच्या प्रतिमेला पुष्पहारार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेपासून बसस्थानकापर्यत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या ठिकाणी असलेल्या सर्व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील संगम चौक येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.

या शोभायात्रेत शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी विविध महामानवांच्या वेशभूषा परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, माजी अध्यक्ष प्रकाश वानेरे , माजी अध्यक्ष पी.सी. चौधरी यांनी शोभा यात्रेला हिरवी झेंडी दिली. शोभायात्रेत महिला मंडळाचीही उपस्थिती मोठया प्रमाणात असल्याचे दिसून आले. जय ज्योती, जय क्रांती, महात्मा जोतिबा फुले यांचा विजय असो, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
        सदर शोभायात्रा शहरातील जयस्तंभ चौक, शहर पोलिसस्टेशन मार्ग, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक मार्ग काढण्यात आली. रात्री १० वाजेच्या दरम्यान या रॅलीचा समारोप कारंजा चौक परिसरात खिचडीचे वाटप करून करण्यात आले.