राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या रक्तदान महायज्ञाचा आदर्श घ्यावा- विजयकुमार ठाकुरवाड* कन्नड येथून उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ : राज्यभरात १०० शिबिरांचे आयोजन

राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या रक्तदान महायज्ञाचा आदर्श घ्यावा- विजयकुमार ठाकुरवाड
* कन्नड येथून उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ : राज्यभरात १०० शिबिरांचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासोबतच राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी सामाजिक उपक्रम राबवण्यात सुद्धा अग्रस्थानी आहे. दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा राज्यभरात १०० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाने संस्थेच्या या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड यांनी केले.

          शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ५ फेब्रुवारी रोजी रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते उदघाटन झाले. आमदार संजनाताई जाधव यांनी कार्यक्रमाला भेट दिली. पुढे बोलतांना ठाकूरवाड म्हणाले की, सध्या अर्थकारण हा महत्वाचा विषय झाला आहे. प्रत्येकाला बचतीचे महत्व कळू लागले आहे. त्यामुळे बँकिंग सेवेची आवश्यकता भासत आहे. राजर्षी शाहू मल्टिस्टेटने ग्राहकांचा विश्वास संपादन करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकिंग सेवा पुरवण्यासह सामाजिक उपक्रम राबविण्यात संस्थेचा पुढाकार राहिला आहे. 

           संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके म्हणाल्या की, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या वतीने राज्यभरात ५ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान १०० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी ज्याप्रमाणे रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता तसाच प्रतिसाद यावर्षी सुद्धा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नवनिर्वाचित स्थानिक संचालक म्हणून राहुल नांगरे, प्रशांत दहातोंडे, दिलीप गांगुर्डे, छाया जाधव, रंजना पवार, भारती पाटील, ज्ञानेश्वर नांगरे, भास्कर खरे यांची नियुक्ती करुन सत्कार करण्यात आला. संचालन राज खडके यांनी केले.