बुलढाण्यात 'फिटस इन फिटू'; आईच्या पोटात बाळाच्या पोटात बाळ * गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीत आला अश्चर्यकारक प्रकार उघडकीस

बुलढाण्यात 'फिटस इन फिटू'; आईच्या पोटात बाळाच्या पोटात बाळ 
* गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीत आला अश्चर्यकारक प्रकार उघडकीस


बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याहीपेक्षा मोठी गंभीर बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसूतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. या गर्भधारणेला मेडिकल भाषेत ‘फिटस इन फिटू' असे म्हणतात.
        मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही घाटाखालची असून तिचे वय 32 वर्षे आहे. तिला याआधी दोन अपत्य आहेत. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की, विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करु शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‌‘फीटस इन फीटू' असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति दुर्मिळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणता पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी असते. जगात अशी घटना 1983 मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली. त्यानंतर आतापर्यंत जागतिक स्तरावर सुद्धा 200 पेक्षा कमी केसेस अर्भकामध्ये अर्भक असल्याच्या घडल्या आहेत.
        घाटाखालची ही गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. दरम्यान स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांच्या सदर महिलेची सोनोग्राफी करताना भुवया उंचावल्या. त्यांनी परत, परत तपासणी केली आणि मग त्यांना कळून चुकले की, आईच्या पोटात बाळ आहेच पण बाळाच्या पोटातही बाळ आहे. त्यांनी तातडीने ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिने यांना कळवली. डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सदर बाब स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याही कानावर टाकली. सदर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते. कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसुती सुलभ होण्याकरता  तिला छत्रपती संभाजी नगर याठिकाणी हलविण्यात आले आहे.

*‌‘फिटस इन फिटू' म्हणजे काय? 
          निसर्गानं मानवाची अशाप्रकारे रचना केली आहे की, विशिष्ट वयानंतर आणि शारीरिक रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करू शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत. नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असलेल्या गर्भधारणेला मेडिकल भाषेत ‌‘फिटस इन फिटू' असे म्हणतात. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढते. साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात अशी, प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसामरी यांनी दिली.

*डॉ. अग्रवाल यांनी केली सोनोग्राफी : 
         ज्यांनी ही सोनोग्राफी केली ते स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सांगितले की, बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही. जुळे लेकरं होतांना असा प्रकार होऊ शकतो. पण हे प्रमाण 5 लाखात एखादे असते. आता पीडियाट्रिक सर्जनच्या देखरेखी खाली प्रसूती करून सदर बाळाच्या पोटात असलेले मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल. अशी प्रसुती क्रिटिकल असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही डॉ. अग्रवाल यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.