* केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले संबंधित विभागाला निर्देशित
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
पीएम कुसुम योजनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या असे निर्देश केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रशासनाला दिले.
बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज 30 जानेवारीला पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणेला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्देशित केले. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे , आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, श्वेताताई महाले, मनोज कायदे, सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर अधिकाऱ्यांना निर्देशित केले. यामध्ये प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारची आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सौरऊर्जेचा वापर वाढवणे हा आहे परंतु जिल्ह्यात या योजनेचा प्रचार प्रसार कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे निर्देशीत केले. शिवाय बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामा संदर्भात आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा खाजगी शाळाप्रमाणेच शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून CBSC पॅटर्न अंगीकृत करावे , जिल्ह्यातील पांदनरस्ते येणाऱ्या मार्च पर्यंत मोकळे करावेत , पिक विम्याचे पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा होण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना कराव्यात , आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना कराव्यात तसेच भालगाव आणि पळशी बुद्रुक येथे नव्याने प्राथमिक केंद्र सुरू करावे, असा ठराव त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत मांडला हा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.