बुलडाणा : (एशिया मंच न्युज)
शाळेतून केवळ डॉक्टर, इंजिनियर, घडविणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच, प्रत्येक शाळेचे ध्येय असावे त्यासाठी वेगवेगळे उपक्रम शाळांनी राबविले पाहिजे. हेच ध्येय शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई किरण पाटिल यांनी केले.
18 व 19 जानेवारी 2025 ला दोन दिवसीय शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे स्नेहसंमेलन उद्घाटक म्हणुन त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले, शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे संचालक तथा शिवसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.एस. लहाने, डी.बी. नरवाडे, बि. एस.पवार, संचालिका मीनाताई लहाने, रविभाऊ लहाने, मनिषा जाधवताई कार्यक्रमास मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चिंचोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक उपक्रमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्ष संवर्धन काळाची गरज, प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी बोलताना स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे एक व्यासपीठ, स्नेहसंमेलनाच उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत विविध कृतियुक्त शिक्षण देणे, वार्षिक स्नेहसंमेलन शालेय जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते. कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणार्थ राहते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या विविध गुणांना पैलू पाडण्याचे काम शाळा करत असते. शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान वर्ग नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी तसेच वर्ग 1 ते १२ वी च्या एक हजार पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रम प्रसंगी एक हजार सातशे पेक्षा जास्त पालकांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा शिवसाई परिवाराचे संस्थापक डी. एस. लहाने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या यशस्वी घोडदौड उपस्थितांसमोर मांडली. यामध्ये विविध स्पर्धात्मक यश जसे 42 विद्यार्थी MBBS, IIT, JEE, MHT-CET मधुन विद्यार्थ्यांची निवड तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये खो-खो या खेळात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेले प्रतिनिधित्व धनुर्विद्या खेळात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेले प्रतिनिधित्व धनुर्विद्या खेळात अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. खेलो इंडिया मध्ये झालेली निवड अशा विविध उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांना माहिती दिली. तसेच मानव गणेश जाधव हा विद्यार्थी धनुर्विद्या खेळामध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर द्वितीय पुस्तक “ स्पर्श” मान्यवरांच्या हस्ते अनावरन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी वर्षभरामध्ये सादर केलेल्या त्यांच्या स्वत:च्या कवीता, लेख, कहाण्या, चित्र, आणि बरेच काही स्पर्श या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले.
शिवसाईच्या दोन दिवसीय जूनून देश बदल रहा है . या थीमवर उत्कृष्ट असे कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले . देशात होत असलेल्या परिवर्तनाचा लेखा जोका घेत विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांसमोर पोहोचवला. देशात होत असलेल्या परिवर्तन देखील विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवण्याचा प्रयत्न केला. या वार्षिक स्नेहसंमेलनाची मागील आठ दिवसाची विद्यार्थी, शिक्षक व पालकांची मेहनत दोन दिवसीय कार्यक्रमाचे दरम्यान सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिवसाई बँक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.