* जाहीर केलेली मानधन वाढीचा शासन निर्णय न काढल्यास 12 जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक आणि शुक्रवारपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला असून या आंदोलनाची दखल न घेतल्यास 12 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बुलढाणा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान समन्वयक यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यातील १८ ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या 23 दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांनी प्रदीर्घ संप केला होता. यावेळी संपाच्या वाटाघाटीत दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी अशांना ७ हजार व गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधनात वाढ करण्याचे जाहीर केले होते, तसेच दरवर्षी २ हजार रुपये दिवाळी भेट सुद्धा देण्याचे मान्य केले होते. आता संप स्थगीत करून दीड महिना झाला तरी सुद्धा अद्याप त्याचा शासन निर्णय काढलेला नाही परंतु त्यांना मोबदल्यात शासनाने भरघोस वाढ केली आहे असे म्हणून त्यांना दिवस रात्र साधनसामग्री नसताना प्रचंड ऑनलाइन काम करायला आरोग्य प्रशासन भाग पाडत आहेत. त्यामुळे कृती समितीच्या आणि राज्य फेडरेशनच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेने 29 डिसेंबर पासून ऑनलाईनच्या सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी कोणतेही ऑनलाईन काम करू नये असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी आपल्या आशा व गटप्रवर्तकांना केले आहे.
शासनाने 12 जानेवारीपर्यंत मानधन वाढीचा शासन निर्णय काढावा अन्यथा 12 जानेवारीपासून आशा व गटप्रवर्तक या पुन्हा एकदा संपावर जातील असे निवेदन राज्य शासनाला कृती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा लोणार, सि.राजा, दे.राजा, मेहकर, शेगाव, मलकापूर, मोताळा इत्यादी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी आज संपाची नोटीस आप आपल्या तालुका आरोग्य अधिकारी यांना दिली.
बुलडाणा येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव सुरेखा पवार, राज्य कौन्सिल मेंबर जयश्री तायडे, कविता चव्हाण, विजया ठाकरे, दिपाली वळसे, प्रज्ञा तायडे, जया कल्याणकर इत्यादी सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
