व्यंकटगिरी नटली : ब्रह्मोत्सवास थाटात सुरुवात * आजपासून संगित भजन व हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांचे कीर्तन

व्यंकटगिरी नटली : ब्रह्मोत्सवास थाटात सुरुवात 
* आजपासून संगित भजन व हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांचे कीर्तन 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
        राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वत सध्या आकर्षक रोषाणाई आणि फुलांच्या तोरणाने नटला आहे. बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे यांनी सपत्नीक गरुड पूजन करुन व गरुड ध्वज चढवून ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ झाला. यावेळी बालाजी सेवा समितीचे सदस्य व बालाजी भक्तांनी सपत्नीक हजेरी लावली होती. या सर्वांच्या उपस्थितीत संकल्प, पुण्यवचन, यज्ञ शाळा प्रवेश आणि बालाजी परिक्रमेने या उत्सवाची थाटात आणि मोठ्या भक्तीभावाने सुरुवात झाली आहे. १७ डिसेंबरपासून संगीत भजन तसेच हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांच्या कीर्तनास सुरुवात होणार आहे. 
     बालाजी सेवा समिती आणि बालाजी भक्त परिवारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी संकल्प, पुण्यवचन, यज्ञ शाळा प्रवेश आणि बालाजी परिक्रमेने ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. तर रविवार, १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ संकल्प, यज्ञ शाळा, महासुदर्शन होम व बालाजी परिक्रमा, सोमवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ७८ ते १२ संकल्प, पुण्यवचन, यज्ञ पूजन आणि बालाजी परिक्रम तर सायंकाळी ७ ते साडेआठ या वेळेत कल्याणोत्सव अर्थात श्रीदेवी व भुदेवी यांच्यासोबत बालाजींचा विवाह सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर ८.३० ते १० वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण होणार आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ संकल्प, पुण्यवचन, १०८ कलश पुजन आणि पूर्णाहुती सोहळा होणार असून दुपारी १२.३० ते १ महाआरती होणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात होणार आहे. ब्रह्मोत्सवादरम्यान दररोज दुपारी २ ते ३ या वेळेत संगीत भजन रंगणार आहे तर ३ ते ५ या वेळेत कीर्तन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान आपेगाव, ता. पैठण. चे अध्यक्ष हभप. अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज, कोल्हापूरकर दादा हे कीर्तन सेवा देणार आहेत. तसेच काल्याचे कीर्तन देखील त्यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांचे कीर्तन श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. त्यासाठी भव्य असे स्टेट आणि मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. बालाजी सेवा समितीचे पदाधिकारी आणि बालाजी भक्त सर्व व्यवस्था चोखपणे बजावत असल्याचे दिसून येत आहे. ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. सायंकाळी छप्पन भोग प्रसाद पार पडला.