सलग ५ दिवसांच्या अन्नत्यागामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली* मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

सलग ५ दिवसांच्या अन्नत्यागामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली
* मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
मुंबई  : (एशिया मंच वृत्त)
      सोळा दिवसाची जिल्हाभर रथयात्रा नंतर महामोर्चा आणि त्यानंतर सलग ५ दिवस अन्नत्याग यामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या यशस्वी बैठकीनंतर रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसोबत जेवण करून आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले, मात्र प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील चर्नी रोड स्थित सैफी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

         सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांची 'एल्गार रथयात्रा' चालली. गावोगावी बैठका, शेतकऱ्यांशी संवाद आणि सभा घेत यात्रेच्या समारोप २० नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे 'एल्गार महामोर्चा'ने झाला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत तुपकरांना २५ नोव्हेंबर रोजी अचानक अटक केली. या कारवाईचा निषेध करत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सलग ५ दिवस त्यांचे अन्नत्याग आंदोलन चालू होते, तर २८ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू ठेवून हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी मुंबईत धडक दिली. 

       राज्य सरकारकडून त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले गेले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे २९ नोव्हेंबर रोजी  बैठक पार पडली, या बैठकीत रविकांत तुपकरांच्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संबधी बहुतांश मागण्या मान्य झाल्या. सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी कर्जत येथे सोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी खाऊन आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.

      परंतु सलग ५ दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली असून त्यांचे ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल कमी झाली आहे, तर किडनीवर परिनाम झाला असून क्रियेटीन वाढले आहे, त्यामुळे २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्यांना उपचारासाठी मुंबईतील (चर्नी रोड) सैफी रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.