वरवंड येथे पाडवा पहाटची रंगली मैफल !* राहुल खरेंच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध* वन बुलढाणा मिशन, राजर्षी शाहू परिवाराचे आयोजन


वरवंड येथे पाडवा पहाटची रंगली मैफल !
* राहुल खरेंच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
* वन बुलढाणा मिशन, राजर्षी शाहू परिवाराचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
      तालुक्यातील वरवंड येथे १४ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे 'पाडवा पहाट' ही शब्द सुरांची सुश्राव्य मैफल रंगली. सुप्रसिद्ध गायक व इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांनी विविधांगी गीतांचा खजाना सादर केला. उपस्थित श्रोत्यांनी सर्वच गीतांना भरभरुन दाद दिली. 
      राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके व मालतीताई शेळके या रसिक दाम्पत्याने संगीत प्रेमींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोबतच स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. वरवंड येथील स्व. वसंतराव नाईक गोदाम परिसरात गुलाबी थंडीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर, ठाणेदार माधव गरुड, जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात, डॉ. माधवी जवरे, डॉ. विनोद जवरे, पांडुरंग सवडतकर, प्रा. कारभारी भानुसे, डॉ. हटकर, नितीन पडघान, पत्रकार राजेंद्र काळे, संजय मोहिते, अरुण जैन, रणजित राजपूत, गणेश पाटील यांच्यासह शेकडो संगीत प्रेमींनी मैफिलीचा आस्वाद घेतला. 
      यावेळी राहुल खरे यांनी एकाहून एक सरस गीते सादर केली. भावगीत, भजन, भारुड, लावणी, अभंग अश्या सर्व प्रकारच्या रचना त्यांनी सादर केल्या. सूर ताल, काव्य अन संगीत याचा सुश्राव्य संगम याठिकाणी बघायला मिळाला. संचलन गणेश धुंदळे यांनी केले. 
* सूर तालाने पाडवा पहाट झाली चिंब :
      गुलाबी थंडी, परिसरात बहरलेली शेती, देखणे आयोजन व संयोजन, एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण, दर्दी संगीत प्रेमींची मिळणारी दाद, अशा थाटात अन दिमाखात पाडवा पहाट रंगली. इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांच्या चौफेर गायकीने उपस्थित दर्दी रसिक मंत्रमुग्ध झाले. माझे माहेर पंढरी, कबिरा कहे ये जग अंधा, उठा उठा सकल जन, मीरा हो गई मगन, हम को किसके गम ने मारा यासह इतर रचना राहुल खरे यांनी सादर केल्या.