* वंचित युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. आस्मानी संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला आर्थिक मदतीचा मोठा हात हवा आहे. त्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक बाला राऊत, महासचिव अर्जून खरात, जि.प. सर्कलप्रमुख अनिल पारवे, विजय पवार, किरण पवार, योगेश हिवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.
जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पाऊस पडला. सोबतच वादळ आणि गारपीटही झाली. तूर, हरभरा, मका, कापूस, भाजीपाला, कांदा, गहू तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाला देखील मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. पोल्ट्री फार्म, गोट फार्म तसेच मेंढ्या, बैल, गायी तसेच अन्य पाळीव प्राणीदेखील वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्याने मृत्युमुखी पडले आहे. यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व शेतीपूरक व्यवसाय करणारा लघू व्यवसायायिक अडचणीत सापडला आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतमजुरांनादेखील हातामाला काम नसल्याने त्यांना किमान मानधन जाहीर करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केली आहे.