* राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवेदनाद्वारे मागणी
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने तालुका अध्यक्ष डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे , दोनही उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस , अजितदादा पवार यांना मोताळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करा यासाठी निवेदन देण्यात आले .
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मोताळा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे तालुक्यातील धरणे भरले नाहीत. विहिरींना पाणी आले नाही. नदी-नाले कोरडेच आहे, अनियमित व कमी पाऊस पडल्यामुळे खरीपाचे पिके जेमतेम आली. खरं म्हणजे सोयाबिन, कपाशी, तुर अशा पिकांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही अशी परिस्थिती आहे.
रब्बी पिके घेण्यासाठी धरणात, विहिरीत पाणी नाही. त्यामुळे रब्बी पिके येतील याची शाश्वती नाही. सदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होत आहे. खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके हातची जात असल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच कर्जबाजारी असलेला शेतकरी अजून कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.
शासनाने नुकत्याच जाहिर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादिमध्ये मोताळा तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरत आहे. त्यामुळे मोताळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. तालुका अध्यक्ष डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात पंजाबराव देशमुख, प्रमोद कळसकर, रामेश्वर पाटील, रफिक बुचर, रियाज पटेल, जायामुद्दिन अमिनोद्दिन, शेख नाजीम, नारायण भीमराव शिंदे, दिलीप गायकवाड, अविनाश वाकोडे, विष्णू वाघ, शे. रशीद शे. इसा, हरिभाऊ कान्सुटले, विश्वास घोगले, विजय बावस्कर, उमेश शरद कोळसे, रामदास तुळशीराम रूट, योगेश कैलास बहादरे, गजानन बाबुराव लहासे, आझाद कुरेशी, संदीप जाधव, गौरव देशमुख, अमरदीप चव्हाण, शरीफ शाह, संजय अवचार यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
