* फसवणूक प्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
नांदुरा : (एशिया मंच वृत्त)
राजकीय पुढाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगत नोकरी लावून देण्याबाबत काही काम असले तर मला सांगा करून देतो, अश्या थापा मारत मुंबई येथील एका भामट्याने नांदुरा येथील महिलेची ५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना १४ फेब्रुवारी ते ६ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलीसांत त्या भामट्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वॉर्ड क्रं १ मधील श्री गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या अर्चना हरीभाऊ बावस्कर वय ३६ वर्षे या महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, सुनील रतन आठवले रा मुंबई याने माझ्याशी ओळख निर्माण करून, 'माझे राजकीय पुढाऱ्यांची ओळख असून नोकरी बाबतचे कोणतेही काम असले तर मला सांगा, मी ते करून देईल, अशी खोटी माहिती व देऊन फिर्यादी बावस्कार यांच्या नातेवाईकाचे नोकरीचे काम करुन देण्यासाठी सदर महिलेकडून वेळोवेळी रोख स्वरुपात, कधी आरटीजीएस तर कधी ऑनलाईन व्यवहाराद्वारे ५ लाख रूपये घेतले. मात्र नंतर आरोपी आठवले याने सरकार बदलल्यामुळे आपले काम झाले नाही म्हणून पैसे परत करतो असे म्हणून ६ ऑक्टोबर रोजी क्षीरसागर यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये परत केले व उर्वरित रक्कम रुपयांबाबत आरोपीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे सुध्दा परत केले नाही. नोकरीचे आमिष दाखवून रोख रक्कम हस्तगत करून फसवणूक केली. याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी आरोपी सुनील रतन आठवले यांच्याविरुध्द भादंवीच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार मुरलीधर वानखेडे हे करीत आहेत.
