बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्यातील युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात येत्या २५ तारखेपासून निघणाऱ्या युवा संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषीकेश म्हस्के पाटील यांनी केले आहे.
युवकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लागल्याशिवाय युवकांचे कल्याण होऊ शकत नाही. कंत्राटी भरती, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शिक्षकांची रिक्त पदे, युवा आयोगाची स्थापना, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, दोन वर्षांपेक्षा अधिक काळ बेरोजगार असलेल्या युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सरकारने भरावं, नोकरदार महिलांसाठी जिल्हानिहाय वसतिगृह, शक्ती कायदा, सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांचे सक्षमीकरण, शाळा दत्तक योजना बंद करणे, रिस्कीलिंग, दोन टायर दर्जाच्या शहरात आयटी कंपन्या आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखणे, तालुका पातळीवर औद्योगिक युनिट सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करून होतकरू युवांना संधी देणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ही युवा संघर्ष यात्रा असणार आहे.
* तुळजापुरातून होणार प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात
दसऱ्याच्या दिवशी २४ तारखेला महात्मा फुले वाडा, लाल महाल,पुणे याठिकाणी भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर शरद पवार हे युवांशी संवाद साधतील आणि या यात्रेची औपचारिक सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
* असा आहे युवा संघर्ष यात्रेचा मार्ग
युवा संघर्ष यात्रा ही पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर या दहा जिल्ह्यातील २८ तालुके आणि ४२० गावांमधून जाणार आहे. या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी https://yuvasangharshyatra.com/en या लिंक वर क्लिक करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन ऋषिकेश म्हस्के यांनी केले.
