भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; तीन ठार* पोखरी फाट्या जवळील घटना

भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; तीन ठार
* पोखरी फाट्या जवळील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     शहरापासून जवळच असलेल्या पोखरी फाट्याजवळ झेंडुची फुले घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आज १४ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. मृतक एकाच कुटुंबातील असून या घटनेने भादोला गावावर शोककळा पसरली आहे.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की,  भादोला येथील रहिवासी असलेले शेख बब्बू शेख मुंसी वय अंदाजे (५५ ) त्यांची पत्नी हमीदाबी शेख बब्बू ( ५०), सून फिरदोस अंजुम शेख नदीम ( २२) व नातू शेख नमीर शेख नदीम  (४) हे दुचाकी क्रमांक (एमएच २८ ए.ए. ११३८) ने बुलडाणा येथून आपल्या गावी भादोल्याकडे जात होते. गाव काही  अंतरावर असतानाच आयशरच्या रुपाने काळ ओढावला. झेंडुंची फुले घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत त्यांना चिरडले. अपघात घडताच आयशरच्या चालकाने गाडीसह घटनास्थळावरुन पळ काढला होता. या अपघातात शेख बब्बू शेख मुंसी, त्यांची पत्नी हमीदाबी शेख बब्बू या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सून फिरदोस अंजुम शेख नदीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात ४ वर्षीय नमीर सुर्दैवाने बचावला परंतु त्याची आई, आजोबा आणि आजी काळाने त्याच्यापासून हिरावून घेतले. अपघाताची माहिती मिळताच भादोला येथील नागरिकांनी घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. 
     बुलडाणा शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दिव्यसेवा प्रकल्पाच्या रुग्णवाहिकेतून अशोक काकडे यांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास बुलडाणा पोलिस करीत आहेत.