जिल्हा मुख्यालयातच बाया बापडयांची जागोजागी होतेय कुचंबना!* स्वच्छता गृहांसह हिरकणी कक्षावरही रूपालीताईंचा रोष

जिल्हा मुख्यालयातच बाया बापडयांची जागोजागी होतेय कुचंबना!
* स्वच्छता गृहांसह हिरकणी कक्षावरही रूपालीताईंचा रोष
(बुलडाणा येथील बस स्थानक परिसरातील स्वच्छता गृहाची पाहणी करतांना रूपालीताई चाकणकर)
____________________________________
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
           राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर नुकत्याच बुलडाण्यात येवून गेल्या. यावेळी त्यांनी शासकीय कार्यालयातील स्वच्छता गृहासह बुलडाणा बसस्थानकावर महिलांसाठी स्थापित हिरकणी कक्षाची पाहणी करून रोषही व्यक्त केला. मात्र महिलांसाठीच्या स्वच्छता गृहाची आणि  बसस्थानक येथील  हिरकणी कक्षाची ही स्थिती प्रातनिधीक आहे. हा प्रकार संबंध बुलडाणा जिल्हयातचं कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे रूपालीताईंनी या स्थितीचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

        बुलडाणा हे जिल्हयाचे मुख्यालय असल्याने येथे विविध कामासाठी दररोज हजारो महिलांची रेलचेल असते. ग्रामीण भागातील महीला या कामानिमित्त येतात तर  शहरातील महिला ह्या ही  काही काम व खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या  महिलांसाठी शहरात कुठेच स्वतंत्र स्वच्छता गृहे उभारण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महिलांची जागोजागी कुचंबना होतेय. पण हे चित्र केवळ बुलडाणा शहरातच नाही तर संबंध जिल्हयातच नव्हेतर राज्यभरात आहे. तरी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी संबंधित विभागाला निर्देशित करून महिलांना या सुविधा लवकर उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून महिलांची होणारी कुचंबना थांबेल.

       महिलांच्या बाबतीत सरकारची भूमिका नेहमी दुटप्पीच राहिली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो की, त्यांच्या मूलभूत समस्यांचा अन्याय होतो तो, महिलांवरच. रूपालीताई महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून राज्यातील महिलांवरील अन्याया विरोधात आवाज उठविण्याचे काम करतात. त्यांच्याकडे महिलांसाठी राबविल्या जावू शकणाऱ्या या विविध योजनांची ब्लु प्रिंट असेल मात्र शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांमध्ये प्रचंड तफावत आहे. राज्यात घरेलू हिंसाचाराच्या घटनेतही महिलांचा बळी जाण्याच्या शेकडो घटना दररोज घडतात. शहरातील महिला असेल तर यावर तात्काळ समाजातून प्रतिक्रीया उमटतात मात्र असाच प्रकार ग्रामीण भागातील एखादया महिले सोबत घडल्यास त्याची माहीती तात्काळ समोर येत नाही. पोलीस विभागही पाहिजे तेवढया गंभीरतेने प्रकरणाची दखल घेत नाही. परिणामी पीडित महिलेला न्याय मिळण्यापासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे महिला आयोगाने ग्रामीण भागात कार्यरत पोलीस प्रशासनाला अशा प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे तसेच जबाबदारी निश्चीत करण्याबाबत आदेशीत करावे.

* ग्रामीण भागातील व काही अंशी शहरी भागातही महिला आयोग काय आहे? हेचं माहीती नाही. महिला आयोगाचे कार्य, आयोगाची कार्यपध्दती आणि आयोगाच्या अंतर्गत येणारी प्रकरणे याबाबत विशेष शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जागृती होणे गरजेचे आहे. जेणेकरून महिलांना आयोगाची कार्य पध्दतीची माहिती मिळण्यासोबतच हा आयोग आपल्या हितासाठी काम करतो. अशी भावना महिलांमध्ये निर्माण होईल

*  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताईंनी जिल्हयातील महिला विषयक समस्यांचा आढावा घेवून त्यावर उपाययोजना सांगितल्या ठोस कारवाई करण्या संदर्भात मात्र सूचना देण्याचे विसरून गेल्या. जोवर एखादया प्रकरणात कुणावर ठोस कारवाई केली जात नाही तोवर महिला आयोगाची जरब निर्माण होणार नाही. आणि महिलांनाही आयोगा बद्दल  आपुलकी व विश्वास निर्माण होणार नाही, इतके मात्र खरे.