* राज्यातील शेतकऱ्यांबद्दल सरकार असंवेदनशील : सतीश पवार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सोयाबीन पिकावर पडलेल्या 'यलो मोझॅक' रोगाने शेतकरी खचून गेला आहे. मोठ्या प्रमाणावर लागवड होणारे सोयाबीन नष्ट होत चालल्याने बळीराजाची अवस्था बिकट झाली आहे. हे सरकार शेतकरी व जनतेविषयी असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनाच 'ग्रीन मोझॅक' आजाराची लागण झाली आहे, अशी खरमरीत टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केली.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश पवार म्हणाले, राज्यभरामध्ये सोयाबीन पिकावर 'येलो मोझॅक' रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे सोयाबीनच्या शेंगा नीट पोसवल्या नाहीत. सगळीकडेच सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्के घट होण्याच्या अंदाज आहे. मात्र, सोयाबीन लागवडीसाठी लागलेला एकूण खर्च तेवढाच असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न शंभर टक्के झाल्यास शेतकऱ्यांना त्यामध्ये खर्च वजा जाता जवळपास पंधरा टक्के नफा होतो. परंतु आता उत्पादनामध्येच ६० टक्के नुकसान झाल्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघून येणार नाही. त्यामुळे शेतकरी हा कर्जामध्ये बुडून जाईल, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
अगोदरच पावसाच्या लहरीपणामुळे व सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहे. आता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी घास येण्याची वेळ आली असता 'यलो मोझॅक' रोगाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आस्मानी संकट उभे ठाकले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची ही हतबल राज्यकर्त्यांना दिसत नाही का? असा सवाल सतीश पवार केला आहे.
सत्ताधाऱ्यांना वाटते सर्व काही आलबेल
राज्यकर्त्यांना सर्वकाही आलबेल वाटत आहे. म्हणजेच सर्वत्र हिरवळच दिसत आहे. जणू काही त्यांच्या डोळ्यांना 'ग्रीन मोझॅक' झाला की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पवार म्हणाले. शासनाने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा काढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना विनाअट विमा स्वरुपात मदत देण्यात यावी, तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी सतीश पवार यांनी केली आहे.
