* बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गेल्या काही दिवसापासुन राज्यात पत्रकारांवर हल्ले वाढत आहे. या विरोधात 17 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील आठ ते दाहा संघटनांनी एकत्र येवुन पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करणे, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करणे बाबत राज्यभर आंदोलन पुकारले होते. बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ, महराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हा बुलडाणा, टि.व्ही. जर्नालीस्ट संघटना जिल्हा बुलडाणा, स्मॉल ॲण्ड मिडीयम न्युज पेपर असोसीएशन पुणे, पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा बुलडाणा, प्रेस काँन्सिल ऑफ इंडीया बुलडाणा, शासनतान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र , रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन जिल्हा बुलडाणा या संघटनांनी एकत्र येवुन जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकार सरंक्षण कायद्याच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला.
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या मार्फ त राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास 200 पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना, धमक्या, शिविगाळ केली गेली. मात्र केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांचा मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील 75 टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थांबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे अशी आमची विनंती आहे.
सरकारकडे आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत, पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, जेणे करून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल. दुसरी मागणी अशी आहे की, पत्रकारांवरील हल्लाचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत. जेणे करून पत्रकारांना न्याय मिळू शकेल. पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील 11 प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरूवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करीत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हे आंदोलन होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. कृपया आपण या विषयात लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना चंद्रकांत बर्दे जिल्हाध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ, बुलडाणा, सुभाष लहाने जिल्हाध्यक्ष महराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हा बुलडाणा, संजय जाधव जिल्हा सचिव, टि.व्ही. जर्नालीस्ट संघटना जिल्हा बुलडाणा, राजेश डिडोळकर संस्थापक कोषाध्यक्ष, स्मॉल ॲण्ड मिडीयम न्युज पेपर असोसीएशन पुणे, सिध्दार्थ पुंडलीक हिवाळे संस्थापक अध्यक्ष, रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन जिल्हा बुलडाणा, पुरूषोत्तम बोर्डे जिल्हाध्यक्ष, शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, विष्णु कंकाळ जिल्हाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा बुलडाणा, सुधाकर अहेर अध्यक्ष, प्रेस काँन्सिल ऑफ इंडीया बुलडाणा, रवी वाघ असोसिएशन आँफ स्माँल अँण्ड मिडियम न्युजपेपर आँफ इंडिया, भानुदास लकडे, संदिप शुक्ला, वसील शेख, संदिप वानखेडे, संजय काळे, प्रा.युवराज वाघ, सिध्दार्थ आराख, संदिप चव्हाण, जितेंद्र कायस्थ, दिपक मोरे, अजय बिल्लारी, शौकत शाह, कासिम शेख, गणेश सोळंके, आदेश कांडेलकर, सुनिल मोरे, नितिन कानडजे, कासिम शेख, भास्कर इंगळे, डिगांबर कंकाळ, शेख असिफ , गणेश उबरहंडे, निलेशकुमार देशमुख, अभिषेक वरपे यांच्यासह अनेक पत्रकार सहभागी होते.
