* सर्व समाजघटकाचा विकास हेच अंतिम ध्येय - आ. संजय गायकवाड
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील सामान्य घटकांना बरोबरीचा अधिकार दिला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि बंधुत्वाचा मंत्र दिला तर महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. हाच समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांची पेरणी करीत आपण राजकारणात सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन काम करीत आहोत. कोण्या विशिष्ट समाजाचा नव्हे तर सर्व समाज घटकांचा विकास झाला पाहिजे हाच हेतू समोर ठेवून मी बुलडाणा मतदारसंघात विकासाची कामे करीत आहे असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या लोककवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याचे 15 ऑगस्ट 2023 रोजी अनावरण आमदार गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील हुतात्मा स्मारक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक साहित्यिक उत्तम कांबळे हे होते. व्यासपीठावर समाजभूषण दिलीपराव जाधव, जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, शाहीर विष्णु शिंदे, माधवराव हुडेकर, विठ्ठल येवले, शाहीर डी. आर. इंगळे, साहित्यिक सुरेश साबळे, धनंजय बारोटे, वैशाली ठाकरे, पत्रकार अजय बिल्लारी, सिद्धार्थ आराख उपस्थित होते. प्रारंभिक आमदार संजय गायकवाड, उत्तम कांबळे व विष्णु शिंदे यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, मतदार संघातील विकास कामासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी आपण आणला. टपऱ्यांचे शहर म्हणून बुलडाणा शहराची ओळख झाली होती, ही ओळख आपण पुसून टाकत दिवाळीपर्यंत बुलडाणा शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकल्या जाईल एवढी शहर सौंदर्यकरणाची कामे सध्या सुरू आहेत. आजच कारंजा चौकातील भारत मातेच्या पुतळ्याचे व जयस्तंभ चौकातील प्रतीकांचे अनावरण झाले. थोड्याच दिवसात हे शहर बघण्यासाठी लोक येतील असा विकास आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी बुद्धविहारासाठी निधी आणला नाही आपण या मतदारसंघात 100 बुद्ध विहारांची निर्मिती करणार असून लोकांच्या मागणीनुसार पुन्हा 50 बुद्ध विहारांचा प्रस्ताव टाकला आहे. लवकरच या 150 बुद्ध विहारांचे काम सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शाहीर विष्णु शिंदे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र साळवे यांनी केले तर संचालन रमेश आराख यांनी केले. आभार प्रदर्शन साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले, शाहीर डी. आर.इंगळे यांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर गीत सादर केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर कलावंत,व समाजाच्या विविध घटकातील पुरुष, महिला भगिनी बहुसंख्येने जिल्ह्यभरातून उपस्थित होते.
