राजे छत्रपती कला महाविद्यालयात क्रांती दिनी हुतात्म्यांचे स्मरण

राजे छत्रपती कला महाविद्यालयात क्रांती दिनी हुतात्म्यांचे स्मरण 
धामणगाव बढे : (एशिया मंच वृत्त)
      मोताळा तालुक्यातील राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे 9 ऑगस्ट 2023 रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग प्रमुख प्रा. दिपक लहासे व करिअर कट्टा समन्वयक डॉ. महादेव रिठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शाहेदा नसरीन तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सागर वानखेडे, डॉ. भगवान गरुडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. दिपक लहासे यांनी 8 ऑगस्ट 1942  रोजी रात्रीपासूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची तयारी झाली होती. महात्मा गांधीजींनी छोडो भारत व करेंगे या मरेंगे चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा क्रांतीदिन म्हणून ओळखला जात असल्याचे स्पष्ट केले.
      प्रा. सागर वानखेडे यांनी क्रांतीकारकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर डॉ. भगवान गरुडे यांनी ऑगस्ट क्रांती ची गौरव गाथा स्पष्ट करुन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. डॉ. शाहेदा नसरीन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना क्रांतिकारकांच्या कार्याचा मागोवा घेत त्यांनी आजच्या पिढीला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे स्वातंत्र्य होय, या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी तरुणांनी सदैव देशसेवेसाठी तत्पर राहीले पाहीजे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.