स्वातंत्र्य संग्रमातील स्मृती… प्रबोधनाचा समृद्ध वारसा

स्वातंत्र्य संग्रमातील स्मृती… प्रबोधनाचा समृद्ध वारसा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप उत्साहात साजरा करण्यात येत आहे. इतिहासाची पाने उलगडल्यास स्वातंत्र्यासाठी संपूर्ण पिढीने स्वातंत्र्यसमरात स्वत:ला वाहून घेतले. विविध पातळ्यांवर स्वातंत्र्यलढा सुरू असताना जनमत तयार करण्यासाठी संत-महात्म्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या प्रबोधनाने स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावी झाला. अशापैकी एक असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी माहिती देणारा लेख…

     स्वातंत्र्यसंग्रामाला अनेक संत-महंतांच्या कार्याचा, प्रबोधनाचा वारसा मिळाला आहे. त्यापैकी एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. या दोन विचारांवर त्यांनी जनमत तयार करीत स्वातंत्र्यसंग्रामात अमूल्य योगदान दिले आहे.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला 11 मे 1909 रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूरबाजार येथे झाले. श्री संत आडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ठेवले.

    तुकडोजी महाराजांनी 1925 मध्ये ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्वत: भजन, कीर्तन, प्रवचन करीत. त्यांनी खंजिरीवर उत्तम भजने गायले. पुढे त्यांना गांधीजींचा सहवास लाभला. 28 ऑगस्ट 1942 रोजी स्वातंत्र्यसंग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. त्यांना डिसेंबरमध्ये सुटका झाली. 1943 मध्ये विश्वशांती नामसप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोव्हेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी सर्वांसाठी मंदिरे खुली केली. ते म्हणत ‘गावा गावासी जागवा। भेदभाव समूळ मितवा, उजळा ग्रामोन्नतिचा दिवा। तुकड्या म्हणे।’

    संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितले आहे, तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचावं?’ हे त्यांच्या ग्रामगीतेच्या ग्रंथाध्ययन या चाळीसाव्या अध्यायात सांगितले आहे.

        सामान्य माणसाने चांगले जीवन कसे जगावे, याचे प्रतिपादन ज्या ग्रंथात केले आहे, ते वाचावेत. फार अवजड तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारा ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्याप्रकारचे जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचे मर्म आपल्याला कळायला हवे. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्याने असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसते, तर सध्याचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असते.

* राष्ट्रसंत तुकडोजींचे कार्य :
      आपला देश हा ग्रामप्रधान आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण या त्यांच्या विचारसराणीचा केंद्रबिंदू होता. देशातील गावांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्राम विकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला. त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही मार्गदर्शक ठरल्यात. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंताचे द्रष्टेपण दिसून येते.

    अमरावतीजवळील मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाची स्थापना आणि ग्रामगीतेचे लेखन ही तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

    गावखेडी कशी स्वयंपूर्ण होतील, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली आहे. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक, सर्वधर्मिय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

    गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवित आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा लक्षणीय पैलू आहे. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रियांवर अवलंबून आहे, हे त्यांनी किर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. देशातील तरुण राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत, जेणेकरून ते समाज आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नितीमान व सुसंस्कृत कसे होतील, याविषयीचे उपदेशपर आणि मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. राष्ट्रसंतानी आपल्या लेखनातून व्यसनाधिनतेचा तीव्र निषेध केला आहे.

* जनजागृतीचा जागर :
     राष्ट्रसंत आपल्या भजनातून जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण आणि अंधश्रद्धा, वाईटरूढी, व्यसने यांचा त्याग करा. अशा आशयाचे थोडावेळ भाषण केले की, हातातील खंजिरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाज आणि सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई. त्यात कुठल्याही स्तरातील किंवा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाई. सर्व पंथ आणि धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी म्हणून संबोधू लागले. ‘ग्रामगीता’ लिहून गाव आणि लोकांचे कल्याण कशात आहे, हे समजाविले. भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्रार्थना करावी, सर्वांशी प्रेमाने वागावे, गोवंश बंदी व पशूसंर्वधन करण्याची शिकवण त्यांनी दिली.

    चीन युद्ध (1962) आणि पाकिस्तान युद्ध (1965) झाले तेव्हा तुकडोजी महाराजांनी सैन्यास धीर देण्यासाठी स्वत: सीमेवर जाऊन वीरगीते गाऊन सैन्याचे धैर्य वाढविले. त्यांचा स्वभाव फार प्रयत्नवादी होता. तन, मन, धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. 11 ऑक्टोंबर 1968 रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी निर्तवले. त्यांचे चरणी शत: शत: प्रणाम.

 * गजानन कोटुरवार,
जिल्हा माहिती अधिकारी, बुलडाणा
मो. 98811 02080