* २७ ऑगस्ट रोजी होणार पुरस्कार वितरण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपूर ही नागपुरातील बुलडाणा जिल्हयाच्या भूमिपुत्रांनी एकत्र येवून १९६४ साली स्थापन केलेली व १९९७ साली नोंदणीकृत झालेली सर्वात मोठी व दीर्घकाळापासून अविरत सामाजिक कार्य करणारी प्रतिष्ठीत संस्था आहे. या मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत बरेच सामाजिक उपक्रम राबवले गेलेले आहेत. भव्य आरोग्य शिबीर, शेगाव येथे तर लोकन्यायलय वरखेड येथे हे प्रामुख्याने अधोरेखीत करण्यासारखे काही उपक्रम तर नागपुर मध्ये दरवर्षी स्नेहमेळावा आयोजन व त्यासाठी उपस्थित असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या लोकप्रतीनिधीच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातील कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार तसेच जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतीनिधींकडे पाठपुरावा करणे व विकासात्मक कामे करून घेणे यासाठी हे मंडळ अग्रणी आहे.
आपआपल्या क्षेत्रामध्ये असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करणे ही परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी मनोरुग्णांची सेवा करणारे अशोक काकडे यांची निवड करण्यात आली आहे. अशोक काकडे समाजसेवी व अध्यक्ष, दिव्या फाउंडेशन बुलडाणा यांच्या विशेष समाजसेवी कार्याची दखल घेत बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपुरने त्यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा मातोश्री के. चंद्रप्रभा बळीराम पडघान (पाटील )स्मृती, बुलडाणा जिल्हा गौरव पुरस्कार - २०२३ (समाजसेवा) जाहीर केलेला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण २७ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.२१०००/- रोख असे आहे. बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपुर नोंदणीकृत सामाजिक संस्था व बुलडाणा अर्बन परिवार बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता सहकार विद्यामंदीर सभागृह, चिखली रोड, बुलडाणा येथे सत्कार समारंभ, व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राध्येशामजी उर्फ भाईजी चांडक तर उद्घाटक म्हणून आर. बी. मालपाणी समाजसेवी व अध्यक्ष विवेकानंद आश्रम, हिवरा बु. यांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अजय संचेती माजी खासदार व प्रसिद्ध उद्योगपती, एकनाथजी डवले प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्रालय, मुंबई हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सुनील कडासने पोलीस अधीक्षक, बुलडाणा, आशा पठाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपुर, विद्याधर महाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा खाजगी सचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विशाल नरवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण, जिल्हा नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थितांमध्ये सर्वश्री सुकेश झंवर, डॉ. राजेंद्र वाघ, श्रीकांत शिंदे डी. एस. पी. भालके, डॉ. विकास बाहेकर, अनिल म्हस्के, राजेश राजोरे अजीम नवाज राही, राजेश हेलगे यांची उपस्थिती लाभणार आहे.
