" ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे आवाहन
सामाजिक न्यायाचे प्रणेते व ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष बिंधेश्वरी प्रसाद मंडल यांची २५ ऑगस्ट २०२३ ही जयंती ओबीसींनी राज्यभर उत्साहात साजरी करावी, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आले.
तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जनता दलाच्या सरकारने संविधान अनुच्छेद ३४० अंतर्गत नमुद सामाजिक व शैक्षणिक मागास जातींचा अभ्यास करण्यासाठी द्वितीय मागास वर्ग आयोगाची स्थापना १ जानेवारी १९७९ साली बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली केली होती.
मंडल आयोगाने ११ निकष ठरवून देशातील सामाजिक व शैक्षणिक जातींचा शोध घेतला. त्यामध्ये ३ हजार ७४३ जातींचा समावेश होता. मंडल आयोगाने ओबीसींच्या उत्थानासाठी ४० शिफारशी अहवालात दिल्या आहेत. अहवाल तत्कालीन राष्ट्रपती यांना १९८० साली सादर करण्यात आला. आयोगाच्या अहवालातील ४० शिफारशींपैकी शासकीय नोकरीत आरक्षण व उच्च शिक्षणामध्ये आरक्षण ह्या दोनच शिफारशी आतापर्यंत ओबीसीसाठी सरकारने लागू केल्या आहेत. यामुळे बी. पी. मंडल यांची जयंती साजरी करत असताना संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
