* येत्या अधिवेशनापुर्वी मुख्यमंत्री यांचेसोबत बैठक लाऊन मागण्या पुर्णत्वास नेऊ
आ. संजय गायकवाड यांचे आश्वासन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी 28 ऑगस्ट 2023 रोजी व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलन मंडपाला भेट देऊन आ. संजय गायकवाड यांनी पत्रकारांच्या मागण्या समजुन घेतल्या. या संदर्भात आजच मुख्यमंत्री यांना पत्र पाठवुन येत्या अधिवेशनापुर्वी पत्रकांराच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन आ.गायकवाड यांनी आज पत्रकारांना दिले.
ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती दयाव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा. अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. या आंदोलन मंडपाला काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय राठोड यांनी भेट दिली.
सदर हे आंदोलन व्हाईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचे नेत़त्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कार्याध्यक्ष अरुण जैन, सरचिटणीस सिध्दार्थ आराख, तालुका अध्यक्ष विजय जट्टे, मोताळा तालुका अध्यक्ष हमीद कुरेशी, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष सुनिल मतकर, मुशीरखान कोटकर, बुलडाणा शहराध्यक्ष गणेश निकम, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, नांदुराचे प्रशांत जुनारे पाटील, जाकिर शाह, साबीर अली, सुखनंदन इंगळे, गजानन धांडे, हर्षनंदन वाघ, शौकत शाह, प्रवीण थोरात, पवन सोनारे, संजय जाधव, मंगेश पळसकर, शेख युसुफ, निलेश शहाकार, नदीम शेख, संदीप वांत्रोले, दिपक मोरे, अशपाक कुरेशी, निलेश राऊत, रहेमत अली, कैलास राऊत, आदेश कांडेलकर, अभिषेक वरपे, आकाश भलेराव यांचेसह जिल्हयातील व बुलडाणा शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
