* पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शहर पोलीस स्टेशन मध्ये आगामी येणाऱ्या सण उत्सवाचे महत्व लक्षात घेऊन ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 29 ऑगस्ट 2023 रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सण उत्सवा दरम्यान सर्वांनी कायदा व सुव्यवस्था, बंधुभाव व जातीय सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन केले.
यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, बँड व डीजे संचालक, ढोल पथक यांना सूचना देताना ठाणेदार काटकर म्हणाले की, आपल्या समाज जीवनात सणांना महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील सण हे आनंद आणण्यासाठी असतात, तसेच सण हे आनंद निर्माण करतात. परंतु काही खोडकर लोक फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा गैरवापर करून सामाजिक सलोखा बिघडवून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही धर्म, जात, महापुरुष आदींबाबत वादग्रस्त पोस्ट टाकल्यास त्याच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. यासोबतच गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंतचे सर्व धार्मिक कार्यक्रम वेळेत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अधीन राहून उत्साहात साजरे करा, असे आवाहनही त्यांनी केले.
