स्वातंत्र्यदिनी ५० हजार घरांत गुंजले राष्ट्रगीताचे स्वर !* किल्ले सिंहगडावरही राष्ट्रगीताचे गायन* वन बुलढाणा मिशनचा उपक्रम : उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल संदीप शेळकेंनी मानले सर्वांचे आभार

स्वातंत्र्यदिनी ५० हजार घरांत गुंजले राष्ट्रगीताचे स्वर !
* किल्ले सिंहगडावरही राष्ट्रगीताचे गायन
* वन बुलढाणा मिशनचा उपक्रम : उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल संदीप शेळकेंनी मानले सर्वांचे आभार 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ५० हजार घरांत राष्ट्रगीताच्या मंजुळ स्वरांची गुंज ऐकायला मिळाली. पुणे येथील किल्ले सिंहगडावर सुद्धा राष्ट्रगीत घेण्यात आले. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आयोजित 'घर तिथे राष्ट्रगीत' या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याने नवा संकल्प घेतला. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी सहभागाबद्दल जिल्हावासीयांचे आभार व्यक्त केले.
     देशाप्रती राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करता यावी, अशी सर्वांची इच्छा असते. मात्र तशी संधी मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकाला देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घरोघरी राष्ट्रगीत घेण्यात आले. वन बुलढाणा मिशनच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन सामूहिक राष्ट्रगीत घेतले.
* मजुरापासून ते उद्योजकांनी गायले राष्ट्रगीत

      घर तिथे राष्ट्रगीत उपक्रमाला जिल्ह्यात भरभरुन प्रतिसाद मिळाला. शेतात काम करणाऱ्या मजुरापासून ते उद्योजक, हॉटेल, रिक्षा चालक, कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स अशा सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी राष्ट्रगीताचे गायन केले. राष्ट्रगीत गायनाचे फोटो, व्हिडीओ वन बुलढाणा मिशनच्या वेब साईटला पाठवले. व्यावसायिक, पत्रकार, विद्यार्थी, खेळाडू, सरपंच, महिला, युवक, युवतींनी उपक्रमात सहभाग नोंदवला. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रगीत घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

* संदीप शेळके यांच्या उपस्थितीत लासुरा येथे राष्ट्रगीत
      स्वातंत्र्यदिनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्हाभर 'घर तिथे राष्ट्रगीत' हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार घरांमध्ये राष्ट्रगीताचे मंजुळ स्वर गुंजले. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत लासुरा (ता. शेगाव) येथील श्रीमती भिकाबाई राजू सिरसाट यांच्या घरी सुद्धा सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थ आणि वन बुलढाणा मिशनचे सदस्य उपस्थित होते.