बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा विकास होऊ शकतो, शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन ही येऊ शकते, शेतीच्या माध्यमातून विकासही साधला जाऊ शकतो असे एक ना अनेक उदाहरणे पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी दिले. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संजीवनी मिळावे व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी भाईजी हे सातत्याने प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नातून त्यांनी मला डोंगर खंडाळ्यासारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले.
त्या शनिवारी डोंगर खंडाळा येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. सदरचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 5 वाजता डोंगर खंडाळ्यातील सहकार विद्या मंदिर प्रांगणात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बन चे सर्वोसर्वा राधेशाम चांडक, हवामान तज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या संकटाला तोंड देत आहे. सातत्याने येणाऱ्या संकटामुळे जिल्ह्यातला शेतकरी हा हाताश झाला आहे. शेतीतले उत्पन्न कमी होत चालले आहे. रासायनिक खताच्या किमती वाढत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यातूनच शेतकरी निराशाग्रस्त होऊन आत्महत्याकडे वळत आहे. जिल्ह्यातील आत्महत्या थांबवा यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक हे सातत्याने प्रयत्नशील असतात. अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल शासनाच्या वतीने 2020 मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरची माहिती राधेश्याम चांडक यांना होताच, जिल्ह्यातला शेतकऱ्यांना राहीबाईचे मार्गदर्शन व्हावे यासाठी ते मागील अनेक दिवसापासून प्रयत्नशील होते.
बुलडाणा जिल्ह्यात हवामानावर आधारित शेती करण्याचे तंत्र व पारंपारिक बियाणांच्या वाणाच्या संरक्षक संवर्धक विषयावर मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन डोंगर खंडाळा येथे केले. सदर कार्यक्रमात राहीबाईंनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करत पारंपारिक शेती तंत्रज्ञान बियाणेचे वाण आदी विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळाव्यास पाहिजे. आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. परिणामी शेतीचा पोत घसरत चालला आहे तसेच त्याचा मानवी जीवनावर देखील दुष्परिणाम होत असल्याचे अनेक संदर्भ, पुरावे राहीबाई यांनी दिले. आपण विचार करून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी या निर्णयास परिवार, नातेवाईक, गावातील लोकांनी प्रचंड विरोध केला, तरी आपण या विरोधाला जुमानले नाही. आज तब्बल तीस वर्ष यामध्ये मी काम केल्यानंतर आता विकासाची दिशा सापडली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पहिल्या वर्षी आम्हाला पाहिजे तसा उत्पन्न मिळाले नाही, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी देखील हीच परिस्थिती राहिली मात्र या तीन वर्षात मी सातत्याने सेंद्रिय खताचा वापर केल्या मुळे शेतीचा पोत सुधारत गेला व तीन-चार वर्षानंतर मात्र शेतीचा कस सुधारल्याने भरमसाठ उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे अनेकांनी माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली.
सदरचा विकास पाहता देशातल्या सर्व नागरिकांना रसायन मुक्त अन्न मिळावे या संकल्पनेतून मी अनेक बचत गट स्थापन केली. जनजागरण प्रारंभ केले. हळदीकुंकवाच्या दिवशी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना देशी बियाणाचे वाण भेट दिल्या. अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून याचे महत्त्व पटवून दिले. मी कधीही शाळेत गेले नाही परंतु आज मी शाळा, महाविद्यालय येथे मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी जात असते, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गांडूळ खत, सेंद्रिय खत यांचा प्रामुख्याने वापर करण्याचे आवाहन करीत विकासाचा मार्ग निवडण्याचे आवाहन ही केले. त्या म्हणाल्या की, मला आजपर्यंत मिळालेल्या विविध पुरस्कार हे काळया मातीच्या सेवेतून मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानावर आधारित शेती करावे असे सुचविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्याम चांडक यांनी केले. संचालन व आभार गजानन धांडे यांनी केले. यावेळी बुलडाणा
अर्बनचे सर्व कर्मचारी गावातील, शेतकरी, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वन औषधीचे महत्व ओळखण्याची आवश्यकता : राधेश्याम चांडक
जंगली औषधी अथवा वन औषधी यांना आज बाजार पेठेत मोठया प्रमाणात मागणी आहे, ही बाब अनेकांना माहित नाही. मेळघाटात उपलब्ध असलेले तिघाडीचे तेल हे आपणाला केवळ मेहंदी लावण्या आधी व नंतर वापरत असल्याची माहिती आहे. मात्र हे तिघाडीचे तेल अंतराष्ट्रीय पातळीवर औषधी, अत्तर आदीसाठी मोठया प्रमाणात वापरले जाते. तसेच आपण जो चहात वापरतो ते गवती चहा, याची मागणी मोठया प्रमाणात आहे. गवती चहाचे तेल निघते व हे आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे हे अनेकांना माहित नाही. याबाबत आम्ही केंद्र सरकारशी बोललो आहो, ते म्हणाले की, आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू की वन औषधी लावा, त्यावेळी आम्ही तुमच्याशी ॲग्रीमेंट करु व तुमच्याकडून ती खरेदी करु असे आश्वासन दिल्याचे सांगितले. पुढे वन औषधीची माहिती देतांना भाईजी म्हणाले की, या वनस्पतीना अधिक पाणी लागत नाही, किंवा मशागतीची आवश्यकता पडत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे वनऔषधी आहेत. याबाबत लवकरच शास्त्रज्ञांशी चर्चा करुन विदर्भात मोठी कार्यशाळा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पावसाला घाबरायच नसतं : पंजाबराव डख
जिल्ह्यात परत 13 ते 15 च्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. कितीही संकटे आली तरी जगात दोन कंपन्या सुरुच राहणार आहे. यात एक औषधीची कंपनी व दुसरी शेती ही कंपनी, त्यामुळेच शेती करणाऱ्याना मी राजा म्हणतो. मात्र या राज्याच व पर्यावरणाच गणित जमत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याने पावसाला घाबरायच नसते. मी सोबत असल्यावर तर विषय नाही, मी तुम्हाला पावसाचा अंदाज सांगत जाईल त्या पध्दतीने तुम्ही कामे करा, असे जाहिर आश्वासन देखील डख यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी पाऊस येण्याचे संकेत उदाहरणासह दिलेत, आणि पाऊस कमी का पडतो याचे देखिल उदाहरण दिले. पंजाबराव डख यांनी योग्य पावसासाठी झाडे लावा, झाडे जगवा असे सांगितले . सोबतच वीजा का पडतात, त्या नेमक्या झाडावरच का पडतात याची सविस्तर माहिती उदाहरणसह त्यांनी दिली.