* विधवा सुनेच्या विवाहसाठी सासू-सासर्यांनीच मुलीचे मायबाप बनावे : जंजाळ पाटील
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने जाफराबाद येथे आयोजित केलेल्या वधु - वर थेट भेट पालक मेळाव्यास जालना जिल्ह्यासह बुलडाणा, पुणे , औरंगाबाद , बीड, लातूर, केज येथील बहुसंख्य वधू - वर पालकांनी उपस्थित राहून मेळाव्यास उस्फूर्त असा प्रतिसाद दिला . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जंजाळ हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून जाफराबाद नगरीच्या नगराध्यक्ष सौ. सुरेखा लहाने, मराठा सोयरीक संघाच्या तालुकाध्यक्ष सौ. सीमा मुरकुटे, सौ. अलकाताई घाटगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदराव पंडित, उपप्राचार्य रमेश देशमुख, शिवाजीराव खरात, राहुल वाकडे हे होते.
सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने विशाल वाकडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. तदनंतर महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव खरात यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आज मराठा समाजामध्ये मुला - मुलींचे विवाह जुळणे होणे व टिकणे ही मोठी समस्या झालेली आहे व याला आपला समाज , वधू - वर पालक बहुतांशी जबाबदार आहेत असे सांगितले. महाराष्ट्र मराठा सोयरीक ही संघटना महाराष्ट्र राज्यात समाजातील जटिल प्रश्न हातात घेऊन मोफत वधु-वर परिचय मेळावे राज्यभर आयोजित करीत आहे. आतापर्यंत या संघटनेने ३१ जिल्ह्यात वधू वर परिचय मेळावे आयोजित करून १५ हजारावर विवाह जमविण्याचे कार्य केले आहे, असेही डॉक्टर शिवाजीराव खरात यांनी सांगितले.
वधु - वर पालक मेळाव्यास केवळ पालकांनीच उपस्थित न राहता आपल्या पाल्यासही बरोबर आणावे . त्यामुळे वधु - वरांचा परिचय होवून विचारांची देवाण - घेवाण होवून विवाह होण्यास मदत होऊ शकेल असे प्रतिपादन सौ. सुरेखा लहाने यांनी केले .
अध्यक्षीय भाषणात जंजाळ यांनी जाफराबाद तालुक्यातील सिंधी हे आपले मूळ गाव असून आज मातृभूमीतील समाज बांधवांचे ऋण फेडल्याचे समाधान व्यक्त करून भविष्यात पुन्हा-पुन्हा असे कार्यक्रम करण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्याच्या या गतिमान युगामध्ये अपघाताचे व आजाराचे प्रमाण वाढलेले असून तरुण वयामध्येच मुलींना विधवा पणाला सामोरे जावे लागत आहे अशा प्रसंगी सासू-सासर्यांनीच मुलीचे मायबाप बनून कन्यादानाचे पुण्यदान पदरात पाडून घ्यावे व कुठेतरी त्या विधवाला आधार द्यावा. संपूर्ण आयुष्यभर विधवा म्हणून राहणे अत्यंत कठीण व अवघड आहे .मराठा समाजाचा इतिहास सांगून बदलत्या काळानुसार अशा प्रकारचे मेळावे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले .
महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंजाळ पाटील यांचा आयोजन व नियोजन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन दत्तु पाटील अंभोरे यांनी केले तर आभार एकनाथ घाटगे यांनी मानले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रभु गाढे, दादाराव सरोदे, सुनील भोसले, सुखदेव सरोदे, रामू शेळके, राजु बर्हाटे, डॉ.सरोदे, कृष्णा शेजुळ, संतोष गव्हाणे, परमेश्वर जाधव, रघुनाथ पंडित, प्रमोद फदाट, शिवाजी भिसे, विनोद खेडेकर, संतोष शेळके, पाराजी उबाळे, अजिंक्य वाकडे, सुनील वरगणे, अक्षय वाकडे, प्रतीक वाकडे, सूरज वाकडे, ऋषी बऱ्हाटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पत्रकार बांधव, तसेच तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.