बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष घटक योजनेतून जिल्ह्याला चांगला निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, तसेच हा निधी खर्च होण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी विशेष घटक योजनेतून निधी मिळविणाऱ्या यंत्रणांना दोन वर्षात निधी खर्च करण्याचा कालावधी दिला आहे. मात्र दोन वर्षाचा अवधी न पाहता निधी याच आर्थिक वर्षात खर्च करण्याचा प्रयत्न करावा. नगर प्रशासन विभागातर्फे या योजनेतून एकही प्रस्ताव सादर केला नाही. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेण्यात याव्यात. नगर प्रशासनातर्फे निधी मागणी प्रस्ताव सादर केले नसल्यास हा निधी इतर विभागांना देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजनांमधून विकास कामे करताना ती चांगल्या दर्जाची व्हावीत, कामे करताना संपूर्ण निधी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.
यावेळी कृषि विभाग, जिल्हा परिषद, उपनिबंधक, सहकारी संस्था, महावितरण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महिला व बालविकास, जिल्हा माहिती कार्यालय आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.