* तलाव खोलीकरणामुळे सिंचनात वाढ
खामगाव : (एशिया मंच वृत्त)
केंद्रीय पर्यावरण श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लघु पाटबंधारे विभागाच्या हिवरखेड येथील राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या साठवण तलावाला भेट दिली. यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर, शिवा लोखंड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.
महामार्गाच्या कामात लागणाऱ्या मुरूम व इतर गौण खनिजासाठी महामार्गालगत असलेल्या नदी, नाले, तलावाचे खोलीकरण करावे. यासाठी कंत्राटदराकडून कोणती रॉयल्टी घेतली गेली नाही. त्यामुळे तळ्याचे खोलीकरण होण्यासोबतच रस्त्यासाठी गौण खनिज उपलब्ध झाले. खोलीकरणामुळे प्रकल्पांची साठवण क्षमता वाढून पिण्याचे आणि सिंचनाला पाणी उपलब्ध होईल. ही संकल्पना तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सांगितली होती. ती राष्ट्रीयस्तरावर बुलडाणा पॅटर्न म्हणून स्वीकारण्यात आली. या संकल्पनेंतर्गत या तलावाचे खोलीकरण झाले होते. यावर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे या परिसरातील पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यावर्षी रब्बीसाठी या तलावातून सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.