गद्दारीचा कलंक त्यांच्या मृत्यूपर्यँतही पुसला जाणार नाही* विरोधी पक्ष नेता अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

गद्दारीचा कलंक त्यांच्या मृत्यूपर्यँतही पुसला जाणार नाही
* विरोधी पक्ष नेता अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       राज्यातला सर्वसामान्य शिवसैनिक हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच ओळखतो. शिवसेनेसोबत गद्दारी करणारांना नाही. त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा  कलंक त्यांच्या मृत्यूपर्यँतही पुसला जाणार नाही, अशा कठोर शब्दात शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला.
       स्थानिक गर्दे हॉल सभागृहात शुक्रवार 16 सप्टेबर 2022 रोजी आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेनेचे प्रा.नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, वसंतराव भोजने, शिवसेना नेता छगणराव मेहेत्रे, दत्ता पाटील, अॅड, आशिष रहाटे, चंदाताई बढे आदी उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले की, जिल्हयातील सर्वच सात विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार लढणार असून शिंदे गटाला उमेदवार मिळणे ही कठीण होईल. बुलडाणा विधान सभेचे आमदार यांचे नाव न घेता ते म्हणाले की, चुन-चुन कर मारण्याची भाषा करणाऱ्यानी जिल्हयात रेल्वे नाही, चांगले दवाखाने नाहीत, विमानतळ नाही असे असताना विधानसभा मतदार संघात हे सगळे चुन-चुन कर आणावे. आम्ही एकाचं संजय राउत यांना मानतो. जो खराखुरा मर्द शिवसैनिक आहे. वेळ येताचं 50 खोके बाहेर येतील, खोके देणारेचं यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. कोरोना काळात देवेंद्र फडणविस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू कोंबण्याची भाषा करणारांच्या बॅनर्सवर सर्वात वर फडणविसांचा फोटो आहे, मग कोण बदललं आम्ही की तुम्ही? असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रात शिवसैनिकांना चुन-चुन कर, गिन-गिन कर मारणारा अजून जन्माला यायचा आहे. आम्ही इथे बसलो आहोत. आताचं चुनून अन् गिनुन घ्या.. आम्ही त्यांनाचं पाठवू बघू काय होतयं ते.. असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला. यावेळी प्रा.नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवत, छगणराव मेहेत्रे, चंदाताई बढे आदींचीही भाषणे झाली.