बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा यासह आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राकाँ कॉँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्या नेतृत्वात धाड ते बुलडाणा पदयात्रा काढण्यात येणार असून, या पदयात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दांडगे यांनी केले आहे.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.राजेंद्र शिंगणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार व राज्यातील शिंदे गट - फडणवीस सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी दीड लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेला, खरे पाहता त्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होता परंतु राजकीय स्वार्थापोटी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरसकट जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शिंदे गट - फडणवीस सरकारने बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कामावरील जी कामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर करून कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देणार होते. त्या कामावरील स्थगिती लवकरात लवकर उठवण्यात यावी, त्यामुळे जिल्ह्यातील विकास थांबला आहे. याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुट करत आहे. त्यामध्ये पेट्रोल, डीझेल, गॅस , जीवनावश्यक गरजेच्या वस्तू इतकेच काय अन्नावर सुद्धा केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे. त्यातच सध्या शिंदे गट - फडणवीस सरकारचे अनेक निर्णय अक्षरशः शेतकरी विरोधी असून सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीला अनुसरून नसून प्रतिकूल ठरताना दिसून येत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे अनेक ज्वलंत प्रश्न सध्या बुलडाणा जिल्ह्यात व राज्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत वेदांता प्रकल्प , ओला दुष्काळ, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे शेतकरी, शेतमजूर, तरुण सर्वच हवालदिल झालेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा, बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, बुलडाणा जिल्ह्यातील कामावरील स्थगिती उठवावी , महागाई कमी करावी यासाठी पदयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे, दांडगे यांनी सांगितले.