अपूर्व पडघानचे यश संपूर्ण राज्यासाठी भुषणावह : रविकांत तुपकर* स्वाभिमानी हेल्पलाईनमध्ये पडघान कुटुंबाचा सत्कार

अपूर्व पडघानचे यश संपूर्ण राज्यासाठी भुषणावह : रविकांत तुपकर
* स्वाभिमानी हेल्पलाईनमध्ये पडघान कुटुंबाचा सत्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       युपीएससीद्वारे सीडीएस (कॉमन डिफेन्स सर्व्हिस) च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बुलडाण्याच्या अपूर्व गजानन पडघान याने अभुतपूर्व अशी कामगिरी केली आहे. सैन्य दलाच्या तिन्ही विभागाच्या संयुक्त परीक्षेत देशातून पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकाविला. या कामगिरी मुळे बुलडाणा जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अपूर्वचे हे यश जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
        तालुक्यातील मेरा बुद्रुक गावचा मूळचा रहिवाशी असलेला अपूर्व गजानन पडघान याने सीडीएस परीक्षेत देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकाविल्याद्दल स्थानिक स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अपूर्व तसेच त्याचे वडील गजानन पडघान आणि आई शालिनी पडघान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळी येथील आयपीएस नंतर आयएएसमध्ये यश संपादीत केलेले विशाल नरवाडे यांचे वडील डॉ. नरवाडे होते. यावेळी रविकांत तुपकर तसेच इतर मान्यवरांच्या वतीने अपूर्ण आणि त्याच्या आई-वडिलांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अपूर्वचे वडील गजानन पडघान यांनी ते स्वत: पोलीस खात्यात नोकरीत असल्यामुळे नेहमीच्या बदल्यांमुळे अपूर्वलाही विविध ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावे लागले. कधी नागपूर, कशी पुसद, कधी अकोला अशा ठिकाणी अपूर्वने शिक्षण घेतले. त्याने आपल्या अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही. २८ वर्षांपूर्वी गजानन पडघान यांनीही या एमपीएससीद्वारे पीएसआयच्या परीक्षेत राज्यातून २० वा क्रमांक मिळवित ते पोलीस अधिकारी झाले होते. वडिलांच्या पायावर पाय ठेवून देशसेवेत आपणच देशाची सेवा करावी या भावनेने अपूर्व झपाटलेला होता. आपलं मेकॅनिक इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला चांगली नोकरीही मिळाली पंरतु त्याचे नोकरीत मन लागत नव्हते आणि त्याने युपीएससीमधूनच सीडीएसची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो नुसताच यशस्वी नाही झाला तर देशातून अव्वल आला. आपल्या मुलाला सॅल्युट मारण्याचे भाग्य आपल्या नशीबी आले ही मोठी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर अपूर्व हा लहानपासूनच अभ्यासात हुशार असल्याचं त्याच्या आई शालिनीताई यांनी सांगितले. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्या आई-वडिलांच, जिल्ह्याच आणि राज्याच नावलौकीक केल्याबद्दल त्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नरवाडे यांनी अपूर्वचे हे यश संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावणारे असून त्याच्या या यशाचे इतर युवकांना प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संदीप चव्हाण तर आभार प्रदर्शन नंदकुमार तुपकर यांनी केले.
कठोर परिश्रमाशिवाय यश नाही – अपूर्व
        कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम घ्यावेच लागतात. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपण मानसिक आणि शिरिरीक परिश्रमात तडजोड केली नाही, प्रचंड अभ्यास करण्यासह मेडिकलमध्ये यशस्वी होण्यासाठी तब्बल २८ किलो वजन कमी करावे लागले, अशी माहिती अपूर्व पडघान यांनी दिली. या यशामध्ये आई-वडिलांचा आणि सातत्याने पाठबळ देणाऱ्या मित्र परिवाराचाही वाटा अल्याचे त्यांनी सांगितले. आई - वडिलांनी विश्वास दाखवून ही संधी दिली त्यामुळे त्यांचाही त्याग मोठा आहे. लॉकडाऊन असल्याने कुठेस क्लासेस लावता आले नाही, कोणत्याही क्लासेसविना केवळ घरीच अभ्यास करुन हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. येथे झालेला सत्कार हा इतर सत्कारापेक्षा वेगळा असून शेतकरी, शेतमजूरांच्या वतीने आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार प्रेरणा देणारा असल्याचेही अपूर्वने सांगितले.