* राजर्षी शाहू पतसंस्थेच्या वतीने शिरपूर येथे बचतगटांना कर्जवाटप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सहकाराच्या माध्यमातून राजर्षी शाहू पतसंस्था भरीव कार्य करीत आहे. विविध उपक्रमांद्वारे सामान्य माणसाला मदतीचा हात दिला जातोय. तळागाळातील प्रत्येक घटकांशी असलेली सामाजिक बांधिलकी पतसंस्थेच्या प्रगतीचे गमक आहे, असे प्रतिपादन हभप माऊली महाराज शेलुदकर यांनी केले.
राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिरपूर येथे २ जानेवारी रोजी बचतगटांना कर्जवाटप, दिनदर्शिका विमोचन, 'राजर्षी पे' पेमेंट ऍपचे लोकार्पण, दिवंगत बाजीराव शेळके यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माऊली महाराज शेलुदकर बोलत होते. मंचावर संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके, सरपंच दिनकरराव पाटील, भगवानराव शेळके, गुलाबराव सुसर, जनार्दन सुसर, दीपक महाराज सावळे उपस्थित होते. माऊली महाराज म्हणाले, शिरपूर गावच्या मातीत कर्तृत्वाचा गुण आहे.गावच्या सुपुत्रांनी अनेक क्षेत्रात नाव कमावले आहे. शिरपूर आणि डोंगरखंडाळा गावांनी सहकाराच्या माध्यमातून भारत गाजवला, असेही त्यांनी सांगितले. रामायणातील विविध दाखले देऊन त्यांनी उपस्थितांना आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले.
संदीपदादा शेळके यांनी आपल्या भाषणातून राजर्षी शाहू पतसंस्थेच्या समृद्ध २० वर्षांच्या परंपरेचा आढावा घेतला. शिरपूर येथे लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज झालेला वटवृक्ष हे ग्रामस्थांच्या माझ्यावरील विश्वासाचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात बचगटांच्या महिलांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करणे असो, कर्जपुरवठा असो किंवा अडचणीच्या काळात कुठलीही मदत करण्यास शाहू परिवार सदैव पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
माऊली महाराज शेलुदकर यांच्या हस्ते बचतगटांच्या महिलांना कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. दिवंगत बाजीराव शेळके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी गावातील माता- भगिनी, नागरिक व संस्थेचे कर्मचारी हजर होते.