मदिना मस्जिद रस्त्यावरच्या खड्ड्यात स्वाभिमानाने लावले बेशरमचे झाड

मदिना मस्जिद रस्त्यावरच्या खड्ड्यात स्वाभिमानाने लावले बेशरमचे झाड
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      स्थानिक इक्बाल नगर परिसरातील मदिना मस्जिदच्या रस्त्यावरील पडलेले खड्डे व झालेली दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व सदर रस्ता दुरुस्तीसाठी स्वाभिमानीचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात आज 29 डिसेंबर रोजी   रस्त्यानवरील खड्ड्यात बेशरमीचे झाड लावून आंदोलन करण्यात आले. या रोडची वर्षभरापासून दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या परिसरात मुस्लीम नागरिक राहतात. त्यांना मस्जिद मध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करावा लागतो. परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व ठीकठिकाणच्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे व वृद्ध व्यक्तींचे अत्यंत हाल होत आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर देखील अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. इक्बाल नगरमध्ये दोन नगरसेवक व नगर अध्यक्ष असून सुद्धा ते फक्त मते मागण्यासाठी परिसरात येतात व नंतर लोकांच्या समस्यांकडे लक्ष देखील देत नाही, अशा परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सततच्या तक्रारीवरून व त्याचे हाल पाहून स्वभिमानीचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी या रस्त्याच्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावून निदर्शने केले. तात्काळ या रस्त्याचे काम सुरु न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना नगर पालिका मुख्याधिकारी यांना बेशरमचे झाड देऊन आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला दिला . यावेळी लकी चौधरी,  उस्मान चौधरी, अफसर कुरेशी, शेख जफर, छोटू भाई, अमर, जावेद  यांच्यासह आदी उपस्थित होते.