जिल्हाधिकारी यांचा बाल संरक्षण सेवांचा आढावा * शिशुगृह, बाल देखरेख संस्थांसह वीटभट्टी वरील बालकांना भेटी..

जिल्हाधिकारी यांचा बाल संरक्षण सेवांचा आढावा 
* शिशुगृह, बाल देखरेख संस्थांसह वीटभट्टी वरील बालकांना भेटी..
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बालकांच्या समस्यांचा आणि सेवांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील बाल संरक्षण सेवांचा आढावा घेतला. त्यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी क्षेत्रभेटी घेतल्या. शून्य ते सहा वयोगटातील अकस्मात कारणाने परीत्यांग केलेल्या, सोडून दिलेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या द लव्ह ट्रस्ट बुलडाणा या सेवाभावी शिशुगृहाला जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांनी भेट दिली. 
      शिशुगृहातील बालकांच्या पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण समिती च्या माध्यमातून मुलांच्या होणाऱ्या पुनर्वसन सेवांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या प्रसंगी शिशुगृहा मार्फत सामजिक कार्यकर्ते अधीक्षक यांनी बालकांच्या सेवांचा आढावा दिला. यानंतर जिल्ह्यात सहा ते अठरा वयोगटासाठी परिस्थिती अभावी काळजी आणी संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/ बालगृह याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. संस्थेत निवासी सेवांचा आढावा, बालकांचे समुपदेशन, आरोग्य आणी मनोरंजन सेवांची तपासणी या भेटी दरम्यान घेण्यात आली. सदर दौऱ्या अंतर्गत पिडीत महिलांच्या अत्यावश्यक अशा सखी वन स्टॉप सेंटरची देखील पाहणी या दरम्यान करण्यात आली. हिंसाचाराने पिडीत महिलांसाठी विधी सेवा, आरोग्य सुविधा, कुटुंबसेवा आधारित समुपदेशन, आहार आणि निवारा इत्यादी सेवांच्या गुणवत्ते बाबत लाभार्थीशी चर्चा या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी केली.
       दौरा कार्यक्रमात जिल्ह्यात स्थलांतर करून येणाऱ्या कामगारांच्या बालकांना देखील गोपनीय भेट जिल्हाधिकारी यांनी दिली. मलकापूर तालुक्यात दाताळा परिसरात कार्यरत वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबाना सर्व सबंधित यंत्रणेसह अचानक भेट देण्यात आली. वीटभट्टीवर कुटुंबासोबत आलेल्या बालकांचे शिक्षण, पोषण आहार, अत्यावश्यक दस्तऐवज जसे राशन कार्ड , आधार कार्ड इत्यादींच्या बाबतीत सेवा देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. बालमजुरांचा प्रश्न गांभीर्याने घेत जिल्ह्यातील धोकादायक परीस्थिती काम करणाऱ्या बालकांच्या सर्वेक्षणाबाबत तसेच त्यांना मिळणाऱ्या सेवांबाबत देखील सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असून बालकांशी निगडीत विभागांना गरजू बालकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण समिती यांच्या समोर सादर करण्याच्या सूचना बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत विभागांना देण्यात आले. सदर बाल संरक्षण विषय दौरा नियोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत करण्यात आले होते.