* कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सद्यस्थितीत हरभऱ्याचे पिक हे वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणत: 8 ते 10 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खावून फस्त करतात. त्यामुळे झाडावर केवळ फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खावून घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे हरभरा पिकावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी आदी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्याचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटक नाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटक नाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीच्या नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे तयार करून शेतात लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सेापे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे या प्रमाणे लावावे. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्यात. पहिली फवारणी 50 टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी / मिली) 500 एल ई / हे. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी 20 मि.ली या घटकाची फवारणी करावी. तसेच दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर करावी. या फवारणीवेळी इमामेक्टीन बॅझोएट 5 टक्के एस जी 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के इसी 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली या घटकाची करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
