* ध्वजदिन निधी संकलनाचाही शुभारंभ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सभागृहात माजी सैनिकांचा मेळावा व ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एअर कमोडोअर प्रमोद वानखडे, फ्लाईंग लेफ्टनंट रत्नाकर चरडे उपस्थित होते. तर सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शहीद जवान व माजी सैनिकांप्रती मनोगत व्यक्त केले. त्यांनी सैनिकांच्या समर्पण वृत्तीचा उल्लेख करीत सैनिकांमुळे आपण सुरक्षीत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पडघान यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन करून चिफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. तसेच शहीद / सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2020 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांना कल्याणकारी निधी अंतर्गत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विरपत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक / विधवा पत्नी व अवलंबित अशाप्रकारे मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. संचलन भास्कर पडघान यांनी केले.