बुलडाणा अर्बनच्या सर्व खातेदारांनी बँक खात्याशी पॅनकार्ड संलग्न करावे* बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची सूचना

बुलडाणा अर्बनच्या सर्व खातेदारांनी बँक खात्याशी पॅनकार्ड संलग्न करावे
* बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची सूचना
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       आयकर विभागाने केलेल्या चौकशी दरम्यान नांदेड येथील बाराशे खातेदारांनी आपल्या खात्याशी पॅनकार्ड संलग्न केले नसल्याचे समोर आले आहे. त्यानुसार या खातेदारांनी पॅनकार्ड आपल्या खात्याशी संलग्न करावे, अशा सूचना प्रत्येक शाखेला व खातेदाराला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिल्या आहेत.
        बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी ही मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी अ‍ॅक्ट नुसार नोंदलेली सहकारी पतसंस्था आहे. तीन राज्यातील ४६५ शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या संस्थेच्या १० हजार १०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेच्यावतीने नांदेड जिल्हयातील ४ साखर कारखान्यांना कर्ज वाटप केले आहे. त्या कारखान्यांच्या चौकशीसाठी आयकर विभागाने बुलडाणा अर्बनकडे रीतसर विचारणा करुन प्रत्यक्ष चौकशी व कागदपत्रांची पडताळणी केली आहे, त्यामध्ये नांदेड जिल्हयातील एकाच शाखेतील खात्यांची पाहणी करुन त्यांना संशयित वाटलेली १२०० खाती गोठवण्यात आली आहेत. त्यातील बहुतांश खातेदार शेतकरी व ग्रामीण भागातील आहेत.
    खाती उघडताना ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही त्यांचे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड घेण्यात आले आहेत. सहकार आयुक्त यांचे परिपत्रक २३ ऑक्टोबर २०१० क्रमांक नाबँका/डि४/पतसंस्था/केवायसी/२०१० खाते उघडताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखपत्र असावे, असे निर्देश असून त्यानुसार पूर्तता केलेली आहे, परंतु याबाबत संबंधित शाखेला सूचना देण्यात आल्या असून संबंधित खात्यांचे पॅनकार्ड लवकरात लवकर खात्याला संलग्न करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याशिवाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
    या शाखेशिवाय संस्थेच्या कुठल्याही शाखेतील कुठल्याही खात्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या खातेदार, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांना काळजी करण्याचे कारण नाही, असे संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केलेले आहे.