* धाड वीज उपविभागीय कार्यालयावर भाजपचा मोर्चा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सक्तीच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याची धडक कारवाई सरकारकडून ऐन रब्बीच्या हंगामात केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या वसुलीसाठी सरकारने टार्गेट दिलेले असल्याने हे सरकार शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीत सक्तीची पठाणी वसुली करत आहे. त्यामुळे सरकारने वसुली बंद करून वीज कनेक्शन कट करणे थांबवावे अन्यथा जनता व शेतकरी हजारो व्होल्टचा शॉक दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आ. श्वेता महाले यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात काढलेल्या धडक मोर्चाला संबोधित करतांना दिला आहे.
धाड येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी वीज वितरण कंपनी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवा. तोडलेले वीज कनेक्शन जोडून द्यावे.शेतकऱ्यांना 10 तास वीज पुरवठा करावा. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्ती करून घ्यावे. केव्हीचे स्वतंत्र विद्युत जनित्रे अत्यंत निकृष्ट असल्याने ते वारंवार नादुरुस्त होतात परंतु दुरुस्ती करून मिळत नाही. त्यामुळे १६ केव्ही सोबतच नियमित पध्दतीने सुद्धा वीज पुरवठा करण्याची व्यवस्था करा. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास लाइनमन तातडीने रिपोर्टिंग करत नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून रटर द्वारे रिपोर्टिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन घ्यावे. ग्रामीण भागातील दिवस व रात्रीची सिंगल फेज लाईन चालू ठेवणे, भरलेले वीज बिल पुढील बिलातून वजा करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.
मोर्चात बुलडाणा पं.स. सदस्य संदिप उगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीरंग एंडोले, सखाराम नरोटे, भागाजी पाटील, माजी तालुकाध्यक्ष तेजराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव गवते, प्रकाश पडोळ, पंडीतदादा देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, संतोष काळे, योगेश राजपूत, किरण सरोदे, गणेश बाजी, अर्जुन लांडे, विशाल विसपुते, जितेंद्र तायडे, गोपाल तायडे, समाधान आघाव, अरुण पाटिल, सोनू तायडे, राजू चांदा, गजानन देशमुख, गणेश साखरे, टीका खान,देवेंद्र पायघन, सुभाष देवकर, मधुकर सपकाळ, काशीनाथ टाकसाळ, राजेश नारायण अपार, दीपक शिनकर, हिरालाल बोडखे, डॉ. गजानन देवकर, प्रदीप पाटील, डॉ. राजेश्वर उबरहंडे, संदीप सोनुने, दत्ता शेवाळे, प्रदीप मडवगडे, केशव तरमळे यांची उपस्थिती होती.
