राष्ट्रीय स्तरावर अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरुडझेप!
* NPTEL परीक्षेत ३० विद्यार्थ्यांचे यश; झुल्कर नैन याला ‘एलिट गोल्ड’चा बहुमान
चिखली : (एशिया मंच न्यूज )
अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, चिखली येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NPTEL परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. जुलै ते डिसेंबर २०२६ या सत्रात महाविद्यालयातील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये प्रमाणपत्रे प्राप्त केली.
या परीक्षेत द्वितीय वर्ष संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी झुल्कर नैन याने ‘Programming in Java’ या अभ्यासक्रमात १०० पैकी ९२ गुण मिळवून प्रतिष्ठेचे ‘NPTEL Elite Gold’ प्रमाणपत्र पटकावले. या यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते त्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. इतर यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्रातील कामगिरीमध्ये एका विद्यार्थ्याने एलिट गोल्ड, दोन विद्यार्थ्यांनी एलिट सिल्व्हर, सात विद्यार्थ्यांनी एलिट, तर २० विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र श्रेणीत यश मिळविले.
कार्यक्रमात राहुलभाऊ बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांनी पदवीसोबत आधुनिक तंत्रज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करून राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अरुण एन. नन्हई यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून या यशात प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रारंभी विभागप्रमुख डॉ. अविनाश एस. कापसे यांनी प्रास्ताविकातून NPTEL अभ्यासक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख तथा NPTEL SPOC डॉ. मेघा पाटील, विभागीय समन्वयक प्रा. जुनैद शेख आणि प्रा. डी. डी. शिपणे उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये झुल्कर नैन, प्रतीश भानुसे, सूरज सोनुने, मयुरी चौधरी, श्रेयश चव्हाण, शेख तकी, यश आडवे, ज्ञानेश्वरी इनामे, लक्ष्मी चोखंडे, भक्ती हिंगे यांच्यासह एकूण ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळाली असून, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
