एल्गार महामोर्चाचा धसका घेतल्यानेच सहकाऱ्यांची धरपकड; रविकांत तुपकरांचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप!
* डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावरील पोलीस कारवाईचा तीव्र निषेध; संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महामोर्चाचा धसका घेतला असून, पोलिसांवर दबाव टाकून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना डोणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईचा तुपकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
डॉ. टाले यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, याबाबत पोलिसांनी कोणतेही स्पष्ट कारण दिले नसल्याचे तुपकर यांनी सांगितले. तसेच मेहकर आणि डोणगाव पोलिसांकडून गावागावांतील कार्यकर्त्यांना फोन केले जात असून, त्यांच्या पत्नींनाही संपर्क साधून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम घेतले जातात, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या तरुणांना अटक करून त्यांचा आवाज दाबला जातो. ही दुटप्पी भूमिका कशासाठी? दुष्काळ संघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि ४ डिसेंबरच्या एल्गार महामोर्चामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशा शब्दांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहकर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ संघर्ष यात्रा आणि एल्गार महामोर्चाचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोपही संघटनेने यापूर्वी केला होता. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचा आवाज कोणत्याही परिस्थितीत दाबू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
