एक हजार रुपयांवरून वाद; योगीराज हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल* महिलेचा नकाब ओढल्याचा एफआयआरमध्ये आरोप; डॉक्टरांचा ‘अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन’चा दावा, सीसीटीव्ही फुटेज देणार

एक हजार रुपयांवरून वाद; योगीराज हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
* महिलेचा नकाब ओढल्याचा एफआयआरमध्ये आरोप; डॉक्टरांचा ‘अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन’चा दावा, सीसीटीव्ही फुटेज देणार
चिखली : (एशिया मंच न्यूज )
        रुग्णालयाच्या बिलातील एक हजार रुपयांच्या थकबाकीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीच्या घटनेत झाले. चिखली येथील योगीराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या प्रकारात रुग्णाच्या नातेवाइकांना मारहाण, शिवीगाळ तसेच महिलेच्या बुरख्याचा नकाब ओढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉस्पिटलचे संचालक सुहास खेडेकर यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध चिखली पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

* नेमका प्रकार काय?
        फिर्यादी हिना परवीन शेख यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ सय्यद मोहीब सय्यद मुबारक यांना २५ नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाल्याने योगीराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णाला सुटी देण्याच्या प्रक्रियेदरम्यान बिलावरून वाद झाला.
        रुग्णाच्या नातेवाइकांनी मेडिकलचे २४ हजार १२७ रुपये ऑनलाइन भरले, तर हॉस्पिटलच्या ११ हजार रुपयांच्या बिलापैकी १० हजार रुपये भरल्याचे तक्रारीत नमूद आहे. उर्वरित एक हजार रुपये काही वेळाने देण्याचे सांगितल्यानंतर वाद सुरू झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

* मारहाण आणि नकाब ओढल्याचा आरोप
          बिलावरून झालेल्या वादादरम्यान डॉक्टरांनी पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेशी धक्काबुक्की करून तिच्या बुरख्याचा नकाब ओढल्याने मानेला ओरखडा पडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.वाद सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावालाही धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

* डॉक्टरांचा प्रतिदावा; सीसीटीव्ही फुटेज देणार
     दरम्यान, हॉस्पिटलचे संचालक सुहास खेडेकर यांनी हे आरोप फेटाळण्याऐवजी आपली वेगळी बाजू मांडली आहे. बिलाची रक्कम कमी करूनही संबंधितांनी वाद घातला, अंगावर बिल फेकले आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा त्यांचा दावा आहे.
        हॉस्पिटल व केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून संपूर्ण प्रकार त्यामध्ये कैद झाला आहे. हे फुटेज पोलिसांना देणार असल्याचे सांगत, ‘ही अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होती,’ अशी प्रतिक्रिया खेडेकर यांनी दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२१ वाजता चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय प्रकाश गिते करीत आहेत.
       एकीकडे रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण व विनयभंगाचे आरोप, तर दुसरीकडे डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाइकांनी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासातून या घटनेतील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.