बालाजी महाराज यात्रेतील कुस्ती दंगल ठरली आकर्षणाचे केंद्र!* वैदू समाजाने जपली ७० वर्षांची परंपरा; महिला पैलवानांचाही आखाड्यात सहभाग

बालाजी महाराज यात्रेतील कुस्ती दंगल ठरली आकर्षणाचे केंद्र!
* वैदू समाजाने जपली ७० वर्षांची परंपरा; महिला पैलवानांचाही आखाड्यात सहभाग
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
       श्री बालाजी महाराज संस्थानच्या वार्षिक यात्रेतील लळितोत्सवानिमित्त वैदू समाजाच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली पारंपरिक जंगी कुस्ती दंगल यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली. तब्बल ७० वर्षांपासून सुरू असलेली कुस्ती दंगलीची परंपरा वैदू समाजाने आजही मोठ्या उत्साहाने जपली आहे. या दंगलीत विविध भागांतून आलेल्या नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला. विजेत्या पैलवानांना आयोजकांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
         कुस्ती आखाड्याचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. आखाड्यातील चुरशीच्या लढतींचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
         यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ आणि नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ असून, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
       आमदार मनोज कायंदे यांनी युवकांनी व्यायामाला प्राधान्य देत राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कुस्ती आखाड्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गावात व्यायामशाळा उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कुस्ती दंगल हा केवळ क्रीडा उपक्रम नसून गावातील सामाजिक एकोपा आणि परंपरा जपणारा उत्सव असल्याचे नमूद केले. अशा स्पर्धांमुळे नव्या पिढीला खेळाची प्रेरणा मिळते. वैदू समाजाने सातत्याने जपलेली ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
तब्बल तासभर रंगली अंतिम कुस्ती
दंगलीतील अंतिम कुस्ती मुख्याधिकारी अरुण मोकळ आणि संदीप नागरे यांच्या हस्ते लावण्यात आली.
         वाशिम येथील पैलवान विजय वारा आणि गंगापूर येथील पैलवान विशाल मागे यांच्यात झालेली ही लढत विशेष रंगतदार ठरली. तब्बल एक तास चाललेल्या या कुस्तीत दोन्ही पैलवानांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अखेर पंचांच्या मध्यस्थीने दोन्ही पैलवानांना समान बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या चुरशीच्या लढतीला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

* महिला पैलवानांनीही गाजवला आखाडा
         या कुस्ती दंगलीचे विशेष आकर्षण म्हणजे महिला पैलवानांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि कन्नड येथील महिला कुस्तीपटूंनी आखाड्यात उतरून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. महिला पैलवानांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण आयोजनाला पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. पोलीस उपनिरीक्षक नितीन मिड, गवई साहेब आणि त्यांच्या पथकाने आखाड्यात बंदोबस्त व नियोजनाच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले. त्यामुळे कुस्ती दंगलीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सुरळीत वातावरणात पार पडला.
         वैदू समाजाने ग्रामस्थांच्या सहकार्याने ७० वर्षांची परंपरा जपत आयोजित केलेल्या या कुस्ती दंगलीतून ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना नवी ऊर्जा मिळाली. चुरशीच्या कुस्त्या, महिला पैलवानांचा सहभाग आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे श्री बालाजी महाराज यात्रेतील लळितोत्सवाला विशेष रंगत आली.