शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी* डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
* डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
       जानेफळ येथील शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत ३० सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूरज ठाकरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोंळकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने हा उपक्रम राबविला. या आरोग्य तपासणीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्याही करण्यात आल्या. तपासणीमध्ये आढळून आलेल्या बाबींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
       यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, संतुलित आहार तसेच विविध आजारांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू व हिवतापापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
      परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या पथकाने केले.
      विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आजारांचे वेळीच निदान व प्रतिबंध करणे शक्य होते. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.